कॅन्सर. म्हणजे साक्षात मृत्यू असाच सर्वसामान्यांचा समज होतो. कॅन्सरचं नाव ऐकूनच अनेकजण खचून जातात.

पण या दुर्धर रोगावरही मात करता येते. त्यासाठी गरज असते योग्य उपचारांची आणि त्यासोबतच हवी असते मानसिक कणखरता, हार न मानण्याची वृती आणि प्रबळ इच्छाशक्ती. युवराजकडे ह्या कशाचीच कमी नाही.

कॅन्सरविरुद्धच्या लढाईत युवराजला त्याच्या कुटुंबियांची, मित्रांचीही साथ मिळालीय. आणि देशभरच्या चाहत्यांच्या प्रार्थनांचं बळही युवीच्या पाठीशी आहे. मात्र एक खास व्यक्ती युवराजसाठी सर्वात मोठा आदर्श ठरलाय. लान्स आर्मस्ट्राँग. अमेरिकेचा प्रसिद्ध सायकलिस्ट आणि कॅन्सर सर्व्हायवर.

कॅन्सरविरुद्ध लढाईचा सर्वात मोठा नायक, रोल मॉडेल म्हणून आर्मस्ट्राँगकडे पाहिलं जातं. लहान वयातच  आर्मस्ट्राँगनं सायकलिंगचं विश्व दणाणून सोडायला सुरूवात केली होती. एरवी युरोपचं वर्चस्व असणाऱ्या या खेळात अमेरिकन आर्मस्ट्राँग वर्चस्व गाजण्याचं स्वप्न पाहात होता. आर्मस्ट्राँग लवकरच सायकलिंगची सर्वात मानाची रेस, टूर द फ्रान्स जिंकेल असं भाकीतही जाणकारांनी केलं होतं.

पण माऊंटन बाईकसारख्या वेगात निघालेल्या आर्मस्ट्राँगच्या गाडीला अचानक ब्रेक लागला. ऑक्टोबर 1996मध्ये, वयाच्या ऐन पंचविशीत, आर्मस्ट्राँगला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं.

आर्मस्ट्राँगच्या शरीरात फक्त एकाच नाही तीन ठिकाणी कॅन्सरनं घर केलं होतं. आर्मस्ट्राँगच्या मेंदूतही कॅन्सर पसरला होता आणि निदान होईपर्यंत कॅन्सर तिसऱ्या टप्प्यांपर्यंत पोहोचला होता. तू जगण्याची शक्यता आता केवळ 40 टक्के आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आर्मस्ट्राँगच्या पायाखालची जमीनच सरकली.

मात्र औषधं, केमोथेरपी आणि ब्रेन सर्जरीनंतर आर्मस्ट्राँगनं कॅन्सरवर मात केली. पुन्हा ट्रेनिंग सुरू केलं आणि दोनच वर्षांत म्हणजे 1998मध्ये तो पुन्हा सायकल रेसेसमध्ये सहभागी झाला. 1999मध्ये आर्मस्ट्राँगनं टूर द फ्रान्स जिंकली आणि त्यानंतर पुढची सहा वर्ष जेतेपद आपल्याकडेच कायम ठेवलं.

सलग सातवेळा टूर द फ्रान्स जिंकणाऱ्या आर्मस्ट्राँगनं एकीकडे स्वतःला समाजकार्यातही झोकून दिलं. कॅन्सरविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यानं लान्स आर्मस्ट्राँग फाऊंडेशनची स्थापना केली. केवळ लिव्हस्ट्राँग बँड्सच्या विक्रीतूनच आर्मस्ट्राँग फाऊंडेशननं आजवर 32 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 162 कोटी रुपये एवढा निधी उभा केलाय.

आर्मस्ट्राँगच्या याच प्रवासाची कहाणी म्हणजे त्याचं आत्मचरित्र, इट्स नॉट अबाऊट बाईक, माय जर्नी बॅक टू लाईफ.  याच पुस्तकानं युवराजलाही प्रेरणा दिलीय.

आर्मस्ट्राँग किंवा युवराज सारख्या खेळाडूंना पाहिलं की एका गोष्टीची जाणीव होते. दैवाचे फासे फिरायला वेळ लागत नाही. पण त्यांच्यासारखे चॅम्पियन्स नशीब घडवण्याचीही ताकद बाळगतात.

क्रिकेटचं जग आणि चाहत्यांची मनं जिंकणारा युवराज कॅन्सरवरही विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. युवराजवर मार्चपर्यंत अमेरिकेतच बोस्टनच्या कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.

क्रिकेटच्या मैदानात लढवय्या आणि आक्रमक खेळाडू, ही युवराजची ओळख.  इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफीमधला तो अजरामर विजय, ट्वेण्टी20 विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडला ठोकलेले सहा षटकार… भारतात वन डे विश्वचषकात ऑलराऊंड परफॉर्मन्स… क्षेत्ररक्षणात चित्त्यासारखी चपळाई.. झोकून देण्याची वृत्ती यामुळेच युवराजनं भारताला अनेक यागदार विजय मिळवून दिलेयत.

पण आता  युवराजपुढचं आव्हान क्रिकेटच्या मैदानातलं नाही. तर ही आयुष्याची लढाई आहे. हार मानणं युवीला कधीच पसंत नाही. त्याच धैर्यानं युवराज कॅन्सरशी झुंज देतोय. गेट वेल सून युवी…

– जान्हवी मुळे

Advertisements