महेन्द्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं वऩ डे विश्वचषक जिंकला आणि अवघ्या देशभर आनंदाला उधाण आलं.. टीम इंडियाबरोबरच करोडो भारतीयांचं विश्वविजयाचं स्वप्न साकार झालं. हा क्षण भारतीयांच्या मनात कायमचा कोरला गेलाय. पण एका भारतीयासाठी, युवराज सिंगसाठी हा क्षण सर्वात खास ठरला. कारण युवराज त्या विश्वचषकाचा मालिकावीर ठरला.

युवराजच्य़ा त्या कामगिरीनं देशवासियांची मान अभिमानानं उंचावली. सर्वत्र सेलिब्रेशन सुरू झालं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

भारताच्या विश्वविजयाच्या हीरोला स्पर्धेदरम्यान अस्वस्थ वाटलं होतं. पण युवराज कोणत्या संकटाचा सामना करतोय, याची पुसटशीही कल्पना कोणाला आली नाही..  तब्बल सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबरमध्ये युवराजच्या फुफ्फुसात ट्यूमर झाल्याचा खुलासा त्याच्या आईनंच केला. आणि त्यानंतर दोन महिन्यांनी स्पष्ट झालं, युवराज कॅन्सरचा सामना करतोय..

युवराजच्या आजाराचं नेमकं निदान व्हायला एवढा वेळ का लागला? तो आजारी होता, मग आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यावर कसा खेळला असे प्रश्न उभे राहतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीच्या फिजियोंनी विश्वचषकानंतर स्पष्ट केलं होतं, की युवराज फिट नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच एनसीएच्या फिजियोंनी युवराजला कर्करोगतज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितलं होतं.

मात्र युवराज आयपीएल सीझन फोरमध्ये खेळायला उतरला. त्यानं चौदा सामन्यांमध्ये पुणे वॉरियर्सचं नेतृत्व केलं.  अखेर 23 मेला युवराजनं तपासणी करून घेतली. जूनमध्ये युवराजची एनएफसी टेस्ट करण्यात आली आणि त्यात युवीला कॅन्सरची शक्यता स्पष्ट झाली होती, असा दावा चंदीगडचे रेडियोलॉजिस्ट पवनदीप कोहली यांनी केलाय.

डॉ. कोहली यांनी युवराजचे वडील योगराज सिंग यांच्यासह इतर निकटवर्तियांना त्याच्या आजाराची कल्पना दिली होती. युवराजचे फिजियो जतिन चौधरी यांनाही त्याला कॅन्सर असू शकतो हे माहित होतं. अर्थात नेमकं निदान होण्यासाठी बायॉप्सीचा सल्ला देण्यात आला. मात्र त्यानंतर युवराजनं आपला सल्ला घेतला नाही, असं कोहली यांनी म्हटलंय.

युवीला ट्यूमर झालाय आणि तो कॅन्सर असू शकतो हे निदान पचवणं युवराजसाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी सोपं नव्हतं.  त्या कठीण परिस्थितीलाही युवराज धीरानं सामोरा गेला. सचिन तेंडुलकरनंही युवराजला आजाराकडे दुर्लक्ष करून नकोस असा सल्ला दिल्ला होता.

पण कॅन्सरचे संकेत मिळाल्यावरही युवराज खेळत राहिला. इंग्लंड दौऱ्यावरही गेला आणि वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेतही खेळायला उतरला. इंग्लंडमध्ये नॉटिंगहम कसोटीत दुखापतीनंतर युवराजनं दौऱ्यातून माघार घेतली. मग भारतात वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत दिल्ली आणि कोलकाता कसोटीतही तो खेळला.

युवराजनं आपल्या आजाराविषयी बीसीसीआयला माहिती दिली नव्हती की, त्याविषयी माहिती असतानाही युवराजचा संघात समावेश झाला? युवराजवर वेळीच उपचार का सुरू झाले नाहीत?

दोष नेमका कुणाचा, फिजियोंचा, निवड समितीचा, बीसीसीआयचा, युवराजच्या कुटुंबियांचा, त्याच्या डॉक्टरांचा की स्वतः युवराजचा? कॅन्सरची शक्यता निर्माण झाल्यावरही अत्याआधुनिक उपचारांपेक्षा वैकल्पिक पद्धतींवर भर का दिला गेला? असाही प्रश्न विचारला जातोय.

स्वतः युवराजनं मात्र, वैकल्पिक उपचार करण्याचा निर्णय माझा स्वतःचा असल्याचं ट्विटरवर स्पष्ट केलंय.

काही जण माझ्या उपचारात उशीर झाला म्हणून माझे गुरूजी आणि बीसीसीआयला जबाबदार धरतायत. पण वैकल्पिक उपचारपद्धती अवलंबण्याचा निर्णय माझा होता. बीसीसीआयच्या सदस्यांनी या कठीण परिस्थितीत मला मोठा आधार दिलाय, त्यामुळेच मी सर्वोत्तम ट्रिटमेंट घेऊ शकतोय..

नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा युवराजच्या आजाराविषयी माहिती जाहीर करण्यात आली. पण त्याचा ट्यूमर धोकादायक नसून लवकरच बरा होईल अशी आशाही निर्माण झाली.  युवराजच्या तिसाव्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याचा मूड पाहून सारं काही आलबेल झालं आहे असंच वाटलं होतं. युवराजनं त्यावेळी ऑस्ट्रेलियातल्या वन डे मालिकेत कमबॅक करण्याचा इरादा बोलून दाखवला. बंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत युवराजनं मेहनत घेतली. सराव सामन्यातही तो सहभागी झाला. मात्र भारतीय संघात त्याची निवड झाली नाही, आणि युवराज अजूनही बरा झाला नसल्याची चर्चा सुरू झाली.

जानेवारीत एनसीएच्या फिजियोंनी युवराजला पुन्हा तपासणी करून घेण्यास सांगितलं. युवराजच्या हृदयाजवळही गाठ असून आजार गंभीर असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला उपचारासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला..

युवराजच्या उपचारात दिरंगाई झाली असली, तरी त्याच्या आजाराचं स्वरूप प्राथमिक आहे आणि म्हणूनच तो ठणठणीत बरा होऊन लवकरच मैदानात उतरू शकतो हा विश्वासही कायम आहे.

जान्हवी मुळे.

Advertisements