लिअँडर पेसनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरूष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत अखेरपर्यंत लढत दिली. मिश्र दुहेरीत पेस आणि रशियाची एलिना व्हेसनिना या जोडीनं उपविजेतेपद मिळवलं. तर पुरूष दुहेरीत त्यानं अंतिम सामन्यात राडेक स्टेपनिकच्या साथीनं अव्वल मानांकित ब्रायन बंधूंचा पराभव केला आणि कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचं अजिंक्यपद मिळवलं

पेसनं पुरूष दुहेरीत 3 वेळा विम्बल्डन, एकदा फ्रेन्च ओपन आणि दोनदा अमेरिकन ओपन जिंकलं होतं. आता ऑस्ट्रेलियन ओपनमधील अजिंक्यपदामुऴे पेसचं करियर स्लॅमही पूर्ण झालं. पुरूष दुहेरीत करियर स्लॅम पूर्ण करणारा पेस पहिलाच भारतीय ठरलाय.

गेली वीस वर्ष टेनिस कोर्टवरील पेसच्या कामगिरीनं वेळोवेळी भारतीयांची मान अभिमानानं उंचावली. पण यावेळी पेसचं यश आणखी उठून दिसतं, ते ऑस्ट्रेलियातच टीम इंडियाच्या पराभवामुळे.

एकीकडे धोनी ब्रिगेडनं कांगारूंपुढे साफ गुडघे टेकले. जिंकण्याचीच काय पण लढण्याची वृत्ती, शेवटपर्यंत टिकून राहण्याची जिद्द भारतीय संघात दिसून आली नाही. त्याचवेळी पेसनं मात्र झुंजार खेळ केला आणि वर्षाच्या सुरूवातीलाच मोठा विजय साजरा केला.

पराभवाला कसं सामोरं जायचं असतं, हेही पेसकडून शिकण्यासारखंय. मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये पहिला सेट गमावल्यावर पेस आणि व्हेसनिनानं हार मानली नाही आणि दुसरा सेट जिंकत सामना टायब्रेकरमध्ये नेला. सामना गमावल्यावरही पेसच्या भाषणानं सर्वांचं मन जिंकलं.

महेन्द्रसिंग धोनीसारखे भारताचे क्रिकेटर्स एरवी प्रेस कॉन्फरन्समध्येही हिंदीत, किंवा आपल्या मायबोलीत बोलणं टाळताना दिसताना पण पेसनं तिथंही आपलं  वेगळेपण दाखवून दिलं.

सचिन, द्रविड, लक्ष्मण, झहीर, सहवागसारख्या क्रिकेटर्सचं वाढतं वय चर्चेचा विषय बनलय. पण त्याचवेळी लिअँडर पेसनं मात्र खेळावर वयाचा फारसा परिणाम होऊ दिलेला नाही. पेस लवकरच 39 वर्षांचा होणार आहे. पण त्याचा खेळ दिवसेंदिवस बहरत असल्याचं पेसचा जुना साथीदार महेश भूपतीनं म्हटलंय.

Twitterवर Bhupathi  – Lee with 2 finals in Aus. If folks only knew how hard that is to do,amazing effort. Seems like he only gets younger every year. #freshlegs

यंदाचं वर्ष ऑलिम्पिकचं वर्षय. पेसचं हे कारकीर्दीतलं सहावं आणि अखेरचं ऑलिम्पिक आहे. साहजिकच वर्षाच्या सुरूवातीला पेसचा विनिंग फॉर्म भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरलाय.

– जान्हवी मुळे

Advertisements