गेल्या शतकातील जगातला सर्वोत्तम खेळाडू कोण, असा प्रश्न विचारला, तर एका नावावर बहुतेकांचं एकमत होईल आणि ते म्हणजे मोहम्मद अली. मोहम्मद अली आज त्याचा ७०वा वाढदिवस साजरा करत आहे.

पूर्वाश्रमीचा कॉशियस क्ले. एका कृष्णवर्णिय अमेरिकन कुटुंबात जन्मलेला सामन्य मुलगा. बारा वर्षांचा असताना क्ले एका सायकल चोराला बेदम चोप देणार होता. क्लेचा आवेष पाहून जो मार्टिन नावाच्या एका पोलिस अधिकारी आणि कोचने त्याला बॉक्सिंगकडे वळण्यास सांगितलं. क्लेने तो सल्ला मानला आणि जगाला मिळाला एक महान चॅम्पियन..

अवघ्या अठराव्या वर्षी क्लेने बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवला. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकलं. पण फक्त गोऱ्यांसाठी असणाऱ्या रेस्टॉरण्टमध्ये प्रवेश नाकारल्याचा राग म्हणून त्याने ते मेडल नदीत फेकून दिलं. त्यानंतर क्ले व्यावसायिक बॉक्सिंगकडे वळला. एकापाठोपाठ एक फाईट्स जिंकत गेला.

फेब्रुवारी १९६४मध्ये सोनी लिस्टनला हरवून क्लेने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आणि त्याची लोकप्रियताही शिगेला पोहोचली. क्लेने इस्लामचा स्वीकार केला आणि मोहम्मद अली ही त्याची नवी ओळख बनली.

अलीचं नाव फक्त बॉक्सिंगपुरतं मर्यादित नाही. एक खेळाडू आणि एक समाजसेवी म्हणूनही त्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

व्हिएतनाम युद्घाच्या वेळी अलीने सैन्यात प्रवेश करण्याचे आदेश मिळाल्यावर स्पष्ट नकार दिला. गोऱ्या अमेरिकनांना हा वार जिव्हारी लागला आणि अलीचं वर्ल्ड टायटल हिरावून घेतलं गेलं. तीन वर्ष त्याला बॉक्सिंगपासून दूर रहावं लागलं. कमबॅक केल्यावर त्याने आपलं टायटल परत मिळवलं आणि १९८१ मध्ये निवृत्ती घेईपर्यंत अली अनेक मोठे विजय मिळवत राहिला.

अलीचे बॉक्सिंगमधले पंच जितके कडक असायचे, तेवढंच त्याचं बोलणं तिखट होतं. अलीच्या कारकीर्दीतील सर्वात एक्सायटिंग काळ म्हणजे जो फ्रेझरबरोबरची त्याची रायव्हलरी. फ्रेझर वर्ल्ड चॅम्पियन अलीला हरवणारा पहिला बॉक्सर ठरला. मात्र अलीने पुढच्या दोन लढती जिंकून फ्रेझरवर वर्चस्व मिळवलं. फ्रेझर गेल्या वर्षीच हे जग सोडून गेला. पण आजही त्याच्या आणि अलीच्या रायव्हलरीची कहाणी सांगितली जाते. द फाईट ऑफ द सेंच्युरी, थ्रिला इन मनिला या दोघांमधल्या गाजलेल्या लढती, शाब्दिक चकमकी दंतकथेचा भाग बनल्या आहेत.

बॉक्सिंग रिंगच्या बाहेरही अलीचं वेगळेपण वेळोवेळी उठून दिसलं. साठच्या दशकात वर्णभेदाविरुद्ध लढाईचाही अली आवाज बनला. पुढे इराकच्या कैदेतील अमेरिकन युद्धकैद्यांना सोडण्याचं अपील करण्यासाठी त्याने सद्दाम हुसेनशीही वाटाघाटी केल्या.

बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना चोपणारा अली, प्रत्यक्षात शांतीचाही दूत बनला. अलीने त्यानंतर स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं आहे. पर्किन्सन्स सारखा आजारही त्याला रोखू शकला नाही. वयाची सत्तरी पार केल्यावर अनेक जण विस्मृतीत जातात. पण अली आजही द ग्रेटेस्ट म्हणूनच ओळखला जातो.

– जान्हवी मुळे.

Original Post http://starmajha.newsbullet.in/sports/more/11916-2012-01-17-07-09-24

Advertisements