लिबियाचा हुकुमशहा मुअम्मर गडाफी मारला गेला, त्याला आता एक आठवडा होतोय. गडाफीचा अंत हा तर अरब राष्ट्रांमधील क्रांतीचा सर्वोच्च बिंदू मानला जातोय. पण ही कहाणी इथेच संपत नाही. आता लिबियाचं काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहेच. मात्र गडाफीच्या अंतानं, जगातल्या इतर हुकुमशाहांनाही थोडं विचारात पाडलं आणि त्यांच्या दडपशाहीखाली पिचलेल्या सामन्यांना नवा हुरूप दिला तर नवल वाटायला नको.

—————–

कोण ठरू शकतं, पुढचा गडाफी? 

सत्ता लोकांना वेडं करते आणि विक्षिप्त माणसं सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात. लिबियाचा मुअम्मर गडाफी हा असाच एक हुकुमशहा होता. निर्दयी, क्रूरकर्मा आणि अहंकारी.. गडाफीच्या अंताबरोबरच कुणालाही न जुमानणाऱ्या अशा हुकुमशहांचं एक पर्व संपुष्टात येतंय. पण आजही, जगात अनेक देशांमध्ये निरंकुश सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांची कमी नाहीए…

फक्त अरब विश्वातच नाही, तर आशियात, आफ्रिकेत आणि त्याहीपलिकडे जगभर, अनेक देशांत हुकुमशहा राज्य करतायत. ट्युनिशियातील जास्मीन क्रांती आणि पाठोपाठ बेन अली, होस्नी मुबारक आणि गडाफीच्या अंतानंतर त्यातील अनेकांचं धाबं दणाणलंय. गडाफीनंतर आता कोणाचा नंबर? असा प्रश्न विचारला जातो आहे. येमनचे अली अब्दुला सालेह आणि सीरियाचा बशर असाद ही दोन नावं यात आघाडीवर आहे.

. अली अब्दुल्ला सालेह – येमेन, वय ६९ वर्ष 

१९७८पासून येमेनवर सालेहचा ताबा आहे. जेमतेम शालेय शिक्षण झालेल्या सालेहनं आधी सैन्यात आणि मग राजकारणातही यशाच्या पायऱ्या भराभर चढल्या. मग सत्ता कायम राखण्यासाठी रक्तपात घडवला.

वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अखेर येमेनी जनतेनं यंदा मोठं आंदोलन सुरू केलं आणि त्या दिवसापासून राजधानी सनामध्ये रोज रक्त सांडतंय.

जून महिन्यात सालेहच्या घरावरच थेट रॉकेटहल्ला झाला, जखमी सालेहला उपचारासाठी सौदी अरेबियात जावं लागलं. त्याला तिथंच थोपवण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय सत्ता करतील असं वाटलं, मात्र गेल्या महिन्यातच तो मायदेशी परतला.

सालेहचं परतणं आणि त्याच सुमारास येमेनमध्ये अमेरिकन हल्ल्यात अल कायदाचा अन्वर अल अवलाकी मारला जाणं, हा निव्वळ योगायोग वाटत नाही. पश्चिमी राष्ट्र सालेहविरोधात फार बोलत नाहीएत.

मात्र आता संयुक्त राष्ट्रांनी सालेहला सत्ता सोडण्याचा आदेश दिलाय. पण अर्थात हा हुकुमशाहा इतक्यात जुमानेल असं वाटत नाहीए..

. बशर असाद – सीरिया, वय ४६ वर्ष

असाद २००० सालापासून, म्हणजे वयाच्या ३४व्या वर्षापासून सीरियाच्या राष्ट्रपतीपदावर आहे. बशरला सत्ता वडिलांकडं वारशानं मिळाली. त्याआधी २९ वर्ष बशरचे वडील,  हफिज अल असादनं सीरियावर राज्य केलं. वडिलांप्रमाणे बशरही बाथ पार्टीचा सदस्य आहे. या निधर्मी आणि समाजवादी पक्षानं सीरियात १९६३पासून आणिबाणी पुकारलीय. राजकीय विरोधकांच्या हत्त्या, जनतेवर बंधनं,प्रसारमाध्यमे आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध अशा पिळवणुकीमुळे सीरियातली जनता पार गांजून गेलीय.

इजिप्तमधील आंदोलनाचं लोण पसरताच सीरियातले लोकही रस्त्यांवर उतरले. तेव्हा राजधानी दमास्कसमध्ये आंदोलकांवर रणगाडे आणि बंदुका चालवण्याचा आदेश असादनं दिला. सीरियात जानेवारीपासून सुरू झालेल्या उठावात आतापर्यंत ३००० जण मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे.

इराकचा शेजार, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती जॅक शिराक यांच्याशी असादची जवळीक आणि असादला इराणचा पाठिंबा आणि बंडखोरांना अमेरिकचा पाठिंबा अशा वेगवेगळ्या समीकरणांमुळे सीरियाचं गणित सुटायला थोडं कठीण आहे.

. रॉबर्ट मुगाबे – झिम्बाब्वे, वय ८७ वर्ष

एकवेळचा आफ्रिकेचा हीरो, नंतर बनला कर्दनकाळ. झिम्बाब्वे, म्हणजे आधीच्या –होडेशियात ब्रिटिशांच्या गो-या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात रॉबर्ट मुगबेंचा सक्रिय सहभाग होता. उठावाचे एक नेते म्हणूनच १९८०मध्ये मुगाबेंची पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.

ब्रिटिशांच्या वर्णद्वेशी राजवटीविरोधात मुगाबेंनी उठाव केला, पण नंतरही गोऱ्यांविरुदध हा आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्यामुळंच साल २०००पासून झिम्बाब्वेवर आंतरराष्ट्रीय समुदायानं निर्बंध लादलेयत. नैसर्गिक संपत्तीनं संपूर्ण असलेलं हे राष्ट्र त्यामुळं मागे पडत गेलं. मुगाबेंनाही अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला.

२००८च्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. मुगाबेंनी विरोधी पक्षांशी संगनमतानं सत्ता कायम ठेवली मात्र बदलत्या जागतिक समीकरणांमुळे त्यांची सत्ताही आणखी अस्थिर बनलीय.

. ह्युगो शावेझ – व्हेनेझुएला, वय – ५७

दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलाचे ५६वे राष्ट्रपती. १९९९पासून सत्तेत असलेला हा एक कलरफुल हुकुमशहा.  शावेझची कारकीर्दही सैन्यातून सुरू झाली. पण १९९२मध्ये त्याचा लष्करी उठाव अपयशी ठरला. पुढे निवडणुकीत उतरून चावेझनं सत्ता मिळवली, पण खुर्ची सोडायला अजूनही तयार नाही. कॅन्सर झाल्यावरही शावेझची सत्तेवरची पकड अजिबात ढिली झालेली नाही.

शावेझ यांचं व्यक्तिमत्व हाही अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. आठवड्यातून एकदा टिव्हीवर हलो प्रेसिडेंट या शो असो किंवा संयुक्त राष्ट्रांचा मंच, शावेझची अदाकारी लक्षात राहते.

शावेझनं व्हेनेझुएलातील उद्योगांचं राष्ट्रियीकरण केलंय मात्र त्याच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आणि दडपशाहीचाही आरोप आहे. या कलरफुल चेहेऱ्याआड हुकुमशहा दडलाय हे वास्तव विसरता येणार नाही. एक मात्र खरं, अमेरिकेच्या अगदी शेजारी राहून समाजवादाचा पुरस्कार करण्याची धमक शावेझनं दाखवलीय. अगदी क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोंसारखी..

फिडेल आता सत्तेतून पायउतार झालेयत. पण क्युबावर त्यांचा प्रभाव कायम आहे. आणि फक्त क्युबामध्येच नाही, तर जगभर कॅस्ट्रोंना गौरवणारे लोकही आहेत. कॅस्ट्रोंच्या पावलावर पाऊल टाकत म्यानमारच्या थान श्वेनंही बदलता काळ पाहून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. सुदानच्या ओमार अल बशीरनेंही आपण २०१५मध्ये सत्ता सोडणार असल्याचं म्हटलंय, पण त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही.

 ओमार अल बशीर सुदान , वय ६७ वर्ष

 

इजिप्तच्या दक्षिणेकडच्या सुदानवर १९८९पासून सत्ता आहे ओमार अल बशीरची. मुअम्मर गडाफीप्रमाणेच बशीरची क्रूरकर्मा म्हणून ख्याती आहे. दार्फरमधील नरसंहाराला बशीरचाच आशीर्वाद होता. २००३साली सुदानच्या दार्फरमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे या परिसरातील ५० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडलेयत तर लाखो लोक बेघर झाले आहेत. मात्र सुदानच्या खनिजसंपत्तीमुळे बशीरविरोधात सहसा शब्द उठताना दिसत नाही.

दार्फरप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं वॉरंट तसंच इजिप्तमध्ये होस्नी मुबारकचा पाडाव आणि ९ जुलैला दक्षिण सुदानच्या स्वातंत्र्यामुळे बशीरला वेसण घातली गेली आहे.

जगात दोन हुकुमशहा असेही आहेत, ज्यांना थोपवणं अगदी अमेरिकेलाही कठीण जातंय..

. आयातुल्ला अली खामेनी इराण, वय ७२ वर्ष

आयातुल्ला रुहुल्ला खोमेनी यांच्यानंतर धर्मगुरू या नात्यानं इराणच्या सर्वोच्च राष्ट्रप्रमुखपदी अली खामेनींची नियुक्ती झाली. इतर हुकुमशहांपेक्षा खामेनी थोडे वेगळे आहेत ते यामुळे. त्यांचं पद संविधानिक असलं तरी त्यांच्या हाती धार्मिक सत्ता आणि राजसत्ता एकवटली आहे.

जून २००९मध्ये इराणच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकांमध्ये महमूद अहमदिनेजाद यांच्या पुनर्नियुक्तीसाठी खामेनींनी पूर्ण पाठिंबा दिला. मात्र या निवडणुकांच्या निकालानंतर इराणमध्ये, खास करून राजधानी तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शनं झाली, ज्याचे पडसाद जगभर उठले. हे आंदोलन चिरडून टाकण्यात अहमदिनेजाद आणि खामेनींना यश आलं. मात्र याच उठावानं कुठेतरी अरब क्रांतीचीही बीजं पेरली असं मानलं जातं.

एक प्रकारे इराणचं राजकारण आणि त्याबरोबरच पश्चिम आशियाचं आणि पर्यायानं जगाचं राजकारण कोणतं वळण घेतं हे खामेनींवर अवलंबून आहे. तर जगाची आण्विक सुरक्षितता उत्तर कोरियाच्या किम जाँगच्या हाती आहे.

.  किम जाँग इल उत्तर कोरिया वय६९ किंवा ७०

१९९४मध्ये वडिल किम इल संग यांच्या मृत्त्यूनंतर किम जाँग उत्तर कोरियाच्या सर्वोच्च पदावर आहे. साम्यवादाच्या लोखंडी पडद्याआड उत्तर कोरियात नेमकी काय परिस्थिती आहे हे कळणं कठीण आहे.

मात्र किमच्या लाईफस्टाईलबद्दल आणि क्रूरपणाबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. त्याला म्हणे विमानप्रवासाची भीती वाटते, म्हणूनच तो कुठेही जाताना एका खास ट्रेननंच प्रवास करतो. काहीसा विक्षिप्त आणि थंड डोक्याचा किम कदाचित जगातला सर्वात ताकदवान हुकुमशहा आहे. कारण इतर हुकुमशहांकडे नसलेली एक गोष्ट त्याच्या हातात आहे- अणुबाँब..

आणि जगासाठी हीच सर्वात मोठी डोकेदुखी आहे..

– जान्हवी मुळे, स्टार माझा.

Advertisements