सबॅस्टियन वेटेलनं सलग दुसऱ्या वर्षी फॉर्म्युला वनची वर्ल्ड चॅम्पियनशिप आपल्या नावावर केलीय... खरंतर यंदाच्या मोसमातल्या चार रेसेस अजून बाकी आहेत पण वेटेलनं इतर ड्रायव्हर्सना कधीच पिछाडीवर सोडलंय....

यंदा वेटेलनं आतापर्यंत पंधरापैकी नऊ ग्रांप्री जिंकल्या आहेत. जपान ग्रांप्रीनंतर ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपच्या शर्यतीत वेटेल दुसऱ्या स्थानावर असलेल्या बटनपेक्षा शंभरहून जास्त गुणांनी पुढे आहे. त्यामुळं सीझनच्या अखेरीस वेटेलच पुन्हा चॅम्पियनशिपची ट्रॉफी उचलणार हे नक्की झालंय.. 

अवघ्या चोविस वर्षांच्या वयातच वेटेलनं सलग दोनदा एफवनचं जगज्जेतेपद मिळवलंय.
याआधी केवळ आठ जणांनीच सलग दोनदा विश्वविजेतेपद साजरं केलंय.  वेटेल आता अल्बर्टो अस्कारी, मॅन्युएल फॅन्जिओ, जॅक ब्रॅबहॅम, अॅलन प्रॉस्ट, आयर्टन सेना, मायकल शूमाकर, मिका हकिनन आणि फर्नान्डो अलोन्सो यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय..

वेटेलचा हा धडाका आजचा नाही, तर एफ वन सर्किटवर पाऊल टाकल्यापासूनच तो रेसिंगची दुनिया गाजवतोय....

- २००७च्या अमेरिकन ग्रांप्रीमधून वेटेलनं फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केलं. १९ वर्ष ३४९ दिवसांच्या कोवळ्या वयात वेटेल फॉर्म्युला वनचा सर्वात युवा ड्रायव्हर ठरला होता.
- आपल्या पहिल्याच ग्रांप्रीत वेटेल दहावा आला आणि पॉइंट्स कमावणारा सर्वात युवा एफवन ड्रायव्हर ठरला.
- पुढच्याच मोसमात वेटेलनं इटालियन ग्रांप्री जिंकली आणि तो एफ वनच्या इतिहासातला सर्वात तरूण विजेता ठरला.
- मग गेल्या वर्षी एफ वनचा सर्वात तरूण वर्ल्ड चॅम्पियन आणि
- आता सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा सर्वात युवा ड्रायव्हर ठरण्याचा मान वेटेलनंच मिळवला. 

वेटेलच्या या यशात त्याच्या टीमचा, रेड बुल रेसिंगचाही मोलाचा वाटाय... फॉर्म्युला वनमध्ये ड्रायव्हर्सच्या कौशल्याइतकंच कार आणि सपोर्ट स्टाफवरही बरंच काही अवलंबून असतं.  

रेडबुलबरोबरचं वेटेलचं गणित जुळून आल्य़ापासून त्याची कारकीर्द बहरात आलीय. आतापासूनच फॉर्म्युला वनच्या महानायकांमध्ये त्याची गणना केली जातेय... 

फॉर्म्युला वनचा सुपर स्टार मायकल शूमाकरच्या देशात, जर्मनीमध्ये वेटेलचा जन्म झाला. शूमाकरचा आदर्श समोर ठेवूनच वेटेलनं रेसिंगमध्ये पाऊल ठेवलं. मग चाहत्यांनी त्याला बेबी शूमी, न्यू मायकल अशी उपाधी दिली होती. तेव्हा वेटेल गंमतीनं म्हणाला होता, मी नवा शूमाकर नाही, तर पहिला वेटेल बनणार आहे.. 

शूमाकरइतका किंवा त्याहीपेक्षा मोठा ड्रायव्हर बनण्याची क्षमता वेटेलमध्ये निश्चितच आहे. आणि एक ड्रायव्हर म्हणून लुईस हॅमिल्टन, फर्नांडो अलोन्सोपेक्षाही तो मॅच्युअर्ड असल्याचं एफवनचे जाणकार सांगतात. 

जान्हवी मुळे, स्टार माझा.
Advertisements