ब्लॅकबर्न रोव्हर्सनी पुणे एफ सीवर ३-० अशी मात केली. पण या सामन्यात, भारतीय फुटबॉलपटूंनीही चाहत्यांची वाहवा मिळवली... 

ब्लॅकबर्न रोव्हर्सच्या भेटीनंतर पुणेकरांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.  

तसं तर भारतात आजवर अनेक दिग्गज खेळाडू आणि मोठे संघ येऊन गेलेयत. जर्मन क्लब बायर्न म्युनिक असो किंवा लीजंडरी पेलेच्या नेतृत्वाखालील न्यूयॉर्क कॉसमॉस.. गेल्या महिन्यात तर अर्जेन्टिना आणि व्हेनेझुएलाच्या संघांनीही भारताला भेट दिली. पण त्यामुळे भारतीय फुटबॉलमध्ये  एखाद्या स्टेडियमच्या डागडुजीपलिकडे फारसा फरक पडलेला दिसला नाही. 

ब्लॅकबर्न रोव्हर्स मात्र फक्त मॅच खेळून परत जात नाहीएत तर भारतातून दर्जेदार फुटबॉलपटू घडवण्यासाठीही हातभार लावणार आहेत.. भारतीय फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग घेता यावं यासाठी रोव्हर्स अॅकॅडमी उघडणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी पुण्याची निवड केलीय.. 

येत्या दीड वर्षात पुण्याच्या मुळशी रोड परिसरात ही अॅकॅडमी सुरू होईल. लंडनच्या ब्रॉकहॉल व्हिलेजमधील ब्लॅकबर्न ट्रेनिंग सेंटरच्या धर्तीवर या अॅकॅडमीची निर्मिती होतेय. त्यामुळं भारतीय फुटबॉलपटूंना इंग्लिश प्रीमियर लीगच्या दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा मिळणार आहेत. या अकादमीच्या माध्यमातून दहा युवा फुटबॉलपटूंना इवूड पार्कमध्ये ब्लॅकबर्न रोव्हर्सच्या खेळाडूंबरोबर ट्रेनिंगची संधी मिळणार आहे. 

राव कुटुंबियांच्या वेंकीज कंपनीनं ब्लॅकबर्न रोव्हर्स क्लब विकत घेतल्यापासून या संघाची नाळ पुण्याशी जोडली गेलीय. ब्लॅकबर्न रोव्हर्सनी भारतात खास करून पुण्यात फुटबॉलच्या विकासाचा विडाच उचललाय. 

एरवी कोलकाता, गोवा, केरळ, अशा राज्यांचं फुटबॉल वेड सर्वश्रुत आहे. आणि बाकी भारतात केवळ विश्वचषकासारख्या स्पर्धेपुरती फुटबॉलची लाट यायची. पण हे चित्र हळूहळू बदलताना दिसतंय. पश्चिम भारतातही फुटबॉलचा प्रसार होतोय.  

चार वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मध्ये पुणे एफसीचीही स्थापना झाली.  पण त्याआधीपासूनच पुणेकरांमध्येही फुटबॉलची लोकप्रियता वाढते आहे. आता ब्लॅकबर्न रोव्हर्सच्या भेटीनं त्याला खतपाणी घातलंय. पण तेवढ्यावरच न थांबता रोव्हर्सनी उत्तम फुटबॉलपटू घडवण्याची मोहीमच हाती घेतलीय..

जान्हवी मुळे, स्टार माझा.
Advertisements