मन्सूर अली खान पतौडी.. म्हणजेच भारतीय क्रिकेटचा टायगर....

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला विजयाची चटक लावली ती पतौडी यांनीच. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी भारतीय संघाचे कर्णधार बनले. १९६२च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारताचे तेव्हाचे कर्णधार नरी कॉण्ट्रॅक्टर चार्ली ग्रिफिथचा चेंडू डोक्यावर लागल्यानं जायबंदी झाले. तेव्हा त्यांच्याऐवजी भारताच्या नेतृत्वाची धुरा पतौडी यांच्याकडे सोपवण्यात आली. कारकीर्दीतल्या चौथ्या कसोटीत, पतौडी भारताचे कर्णधार बनले.  २००४मध्ये टटेंडा टायबूनं २१व्या वर्षी झिम्बाब्वेचं नेतृत्व करेपर्यंत, पतौडी कसोटी क्रिकेटमधले सर्वात तरूण कर्णधार होते.

त्यांनी ४० कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, पतौडी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं नऊ कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारतानं परदेशात पहिली कसोटी जिंकली ती पतौडी यांच्या नेतृत्वाखालीच. १९६८ साली न्यूझीलंड दौऱ्यात पतौडी यांच्या भारतीय संघानं डनेडिन कसोटी जिंकली होती. 

पतौडी यांनी आपल्या कारकीर्दीत ४६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यात पतौडी यांनी ३४.९१च्या सरासरीनं २७९३ धावा फटकावल्या. त्यात सहा शतकं आणि १६ अर्धशतकांचा समावेश होता. 

विशेष म्हणजे पतौडी यांचा उजवा डोळा त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी एका कार अपघातात जवळजवळ निकामी झाला होता. पण त्यानंतरही हिंमत न हारता ते तब्बल १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.  

१९७५मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. काही वर्ष स्पोर्टसवर्ल्ड या मासिकाचे संपादक आणि टीव्ही कॉमेंटेटरच्या रुपानं पतौडींनी क्रिकेटशी नातं टिकवून ठेवलं. नव्वदच्या दशकात काही काळ त्यांनी मॅच रेफ्री म्हणूनही काम पाहिलं. 

पतौडी यांचे वडील इफ्तिखार अली खान यांनीही भारत आणि इंग्लंडचं कसोटीत प्रतिनिधित्व केलं होतं. या दोघा पितापुत्रांच्या सन्मानार्थ २००७ पासून भारत आणि इंग्लंडमधली कसोटी मालिका पतौडी ट्रॉफी या नावानं ओळखली जाऊ लागली. 

२००७ पासून पतौडी बीसीसीआयचे सल्लागार म्हणून काम पाहात होते. आयपीएल गव्हर्निंग कौंसिलमध्येही त्यांचा समावेश होता. मात्र ललित मोदी प्रकरणानंतर गेल्या वर्षी आयपीएलमध्ये मोठे बदल झाल्यावर पतौडी यांनी काम करण्यास नकार दिला. आयपीएलवर नजर ठेवण्यात गव्हर्निंग कौंसिलला अपयश आल्याचं मान्य करणारे पतौडी एकमेव अॅडमिनिस्ट्रेटर होते. 

जान्हवी मुळेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा.
Advertisements