रविवारी कर्जतमधल्या लोकांनी रॅली काढली. असं पहिल्यांदाच झालं की, गावात कुणी काही आंदोलन करतंय आणि मला ‘तुम्ही पहा ना, कव्हर करता आलं तर’ असा फोन आला नाही. आंदोलनात उतरलेल्यांची सच्चाई त्यातून दिसून येते.

गावातली वेगवेगळ्या गटांत दिसणारी अनेक तरूण मुलं एकत्र आली. ठिकठिकाणी हेच चित्र दिसतंय. मुलं जे करतायत ते केवळ प्रसिद्धीसाठी नाही. लोकांना खरंच बदल हवाय आणि तो आपणच घडवण्याची ही एक संधी आहे.

मीही रॅलीबरोबर चालले, रॅलीत पूर्णपणे सहभागी नाही झाले, कारण माझी प्रोफेशनल एथिक्स आणि मतभिन्नता. पण खरं सांगायचं, तर या आंदोलनात, मतांपेक्षा विचार मोठाय, त्यामागची भावना मोठी आहे.

लोकपाल विधेयक मांडल्यानं किंवा तसा कायदा तयार झाल्यानं हे आंदोलन थांबता कामा नये. ही पेटलेली ठिणगी आहे आणि निखारे कायम रहायला हवेत. फक्त घोषणाबाजी करू नका. प्रत्यक्ष काम करा. लोकांना या विधेयकाविषयी माहिती द्या. अनेकदा केवळ लोकांचं अज्ञान आणि डोळेझाक यामुळेच घोटाळेबाज फोफावतात. (घरचं उदाहरण द्यायचं तर पेण अर्बन बँकेचं प्रकरण. अनेकांनी केवळ जास्त इंटरेस्ट रेट आहे म्हणून पैसा तिकडे ठेवला पण बँकेतल्या घडामोडींवर आधीपासूनच लक्ष ठेवता आलं असतं. असो.)

आसपास कुठे भ्रष्टाचार होताना दिसत असेल तर त्याविरुद्ध उभे रहा. लोकपाल कायदा झाला, तर उत्तमच. पण माहिती अधिकारासारखे सध्याचे कायदेही भ्रष्टाचार उघड करण्यासाठी उपयोगी आहेत. सगळ्यांनी एकत्र आवाज उठवला तर खूप काही साध्य होतं. देश बदलण्यासाठी आधी स्वतःपासून, आपल्या घरापासून, गावापासून सुरूवात करायला हवी. spread the word… कर्जत यूथ फोरमला शुभेच्छा!

Advertisements