सचिन तेंडुलकर. पायचीत, गोलंदाज जेम्स अँडरसन…

लॉर्डसपाठोपाठ नॉटिंगहममध्येही जेम्स अँडरसननं सचिन तेंडुलकरला आपलं गिऱ्हाईक बनवलं. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसननं सचिनला बाद करण्याची ही सातवी वेळ होती. विशेष म्हणजे केवळ पाच वर्षांत आठच कसोटी सामन्यांत अँडरसननं सातवेळा सचिनला बाद केलंय.

सचिन पहिल्यांदा अँडरसनची शिकार बनला २००६ साली. मुंबई कसोटीत गेरेन्ट जोन्सनं अँडरसनच्या गोलंदाजीवर सचिनचा झेल टिपला. सचिनला त्या डावात केवळ एकच धाव घेता आली.

२००७च्या इंग्लंड दौऱ्यावर अँडरसननं सचिनला तीनवेळा बाद केलं. लॉर्डस कसोटीत सचिन ३७ धावांवर पायचीत झाला. मग ओव्हल कसोटीत एकाच दिवसात दोनदा अँडरसननं सचिनची शिकार केली. पहिल्या डावात अँडरसनच्या गोलंदाजीवर अँड्र्यु स्ट्राऊसनं सचिनचा झेल टिपला तर दुसऱ्या डावात अँडरसननं सचिनचा त्रिफळा उडवला.

२००८च्या मोहाली कसोटीत अँडरसननं सचिनला पाचव्यांदा बाद केलं. सचिन अवघ्या ५ धावांवर असताना ग्रॅमी स्वाननं त्याचा झेल पकडला.

आणि आता या इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अँडरसननं सचिनला पायचीत केलंय. म्हणजे या मालिकेत चारपैकी दोन ड़ावांत सचिन अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

कसोटी क्रिकेटमध्ये केवळ मुथय्या मुरलीधरननंच अँडरसनपेक्षा जास्त वेळा म्हणजे आठवेळा सचिनला बाद केलंय. तर जेसन गिलेस्पी आणि मॅकग्रानं सहावेळा सचिनची विकेट काढलीय.

एकदिवसीय सामन्यांमध्येही अँडरसननं 11 सामन्यांमध्ये तीनदा सचिनची विकेट काढलीय. म्हणजे आजवर दहावेळा अँडरसननं सचिनला निरुत्तर केलंय.

कसोटी आणि वन डेमध्ये मिळून ब्रेट लीनं सर्वाधिक १४ वेळा. चमिंड वास आणि मॅग्रानं प्रत्येकी १२ वेळा बाद केलंय. तर अँडरसननं आताच १० वेळा सचिनची विकेट काढलीय.

चित्र स्पष्टंय. स्वामी तिन्ही जगाचा, अँडरसनसमोर भिकारी..

क्रिकेटच्या विक्रमादित्याकडेही जेम्स अँडरसन नावाच्या प्रश्नावर उत्तर नाहीये. फलंदाजीत खोऱ्यानं धावा करणारा सचिन जेम्स अँडरसनपुढे ढेपाळतोय.

सचिनला कुणी निरुत्तर करण्याची ही पहिली वेळ नाही. तुम्हाला फॅनी डिव्हिलियर्स आठवतोय? दक्षिण आफ्रिकेचा हा राईट आर्म मीडियम पेसर अगदी सांगून सचिनची विकेट काढायचा.

 

मॉण्टी पानेसरच्या लेफ्ट आर्म स्पिननंही सचिनला असंच सतावलं होतं. तसं तर लेफ्ट आर्म स्पिन ही सचिनची कमजोर कडीच आहे. आणि याच कमजोरीचा फायदा उठवला होता इंग्लंडचा कर्णधार नासीर हुसेननं. २००१-२००२मध्य़े अॅश्ले जाईल्सच्या लेफ्ट आर्म स्पिननं सचिनला पक्क जखडून ठेवलं होतं.

क्रिकेट इज ग्रेट लेव्हलर असं म्हणतात. कितीही मोठा खेळाडू असला, तर त्याला प्रत्येक नवा चेंडू खेळताना शून्यापासूनच सुरूवात करावी लागते. अँडरसननं ते नेमकं जोखलंय, आणि म्हणूनच त्यानं वारंवार सचिनला आपलं गिऱ्हाईक बनवलंय.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत शतकांचं शतक सचिनला खुणावतंय. पण ते स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर सचिनला अँडरसन नावाचं कोडं सोडवावंच लागेल.

– जान्हवी मुळे.

Advertisements