अखेर केंद्र सरकारला जाग आलीय…  भारतरत्न सन्मानासाठी खेळाड़ूंचाही विचार व्हावा यासाठी दिल्लीत वेगानं हालचाली सुरू आहेत.

भारतरत्न म्हणजे देशातला सर्वोच्च सन्मान. कला, साहित्य, विज्ञान आणि समाजासाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय, देशाचं नावं उज्ज्वल केलंय त्यांनाच भारतरत्न मिळायचं. पण आजवर एकाही खेळाडूला हा पुरस्कार मिळू शकला नाही. कारण तशी तरतूदच नव्हती. पण आता केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनी खेळाडूंचाही भारतरत्न पुरस्कारासाठी विचार केला जावा अशी शिफारस केलीय, केंद्रीय गृह मंत्रालयानंही त्याला सहमती दिलीय. आता फक्त पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब झालं की खेळाडूंना भारतरत्न देण्याचा मार्ग मोकळा होईल.

भारतरत्न पुरस्कारांची सुरूवात १९५४ मध्ये झाली आणि आजवर ४१जण भारतरत्नचे मानकरी ठरलेयत. पण खेळाडूंनाही हा सन्मान दिला जावा असा विचार पुढे यायला एकवीसावं शतक उजाडावं लागलं. हे द्योतक आहे या देशाची मानसिकता बदलल्याचं. आजवर राजकीय किंवा सामाजिक नेते, कलाकार ही मंडळीच देशाची प्रतीकं किंवा आयडॉल्स आहेत असं मानलं जायचं. पण विसावं शतक मावळतीला जाऊ लागलं आणि खेळाडूंनीच भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली..

सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलीय सचिन तेंडुलकरनं. १९८९मध्ये सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं आणि तेव्हापासूनच सचिन म्हणजे भारताचं प्रतीक बनलाय. नव्वदच्या दशकातला तरूण सचिन आणि आर्थिक उदारीकरणानंतर नव्यानं उभा राहणारा भारत.. आज क्रिकेटच्या शिखरावर विराजमान झालेला सचिन आणि महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करणारा भारत.

परिकथेसारखं वाटलं तरी हे खरं आहे.. भारताच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या काळात सचिनच्या मैदानावरील कामगिरीनं वेळोवेळी देशवासियांची मान अभिमानानं उंचावलीय. त्याच्यासारख्या खेळाडूंनी भारतीयांना पुढे जाण्याची प्रेरणा दिलीय.

सर्वात आधी नाव घ्यावं लागेल विश्वनाथन आनंदचं. बुद्धिबळाच्या पटावर आनंदही दोन दशकांपासून अधिराज्य गाजवतोय. गेलं दशकभर चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपवर त्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान खेल रत्नचा आनंदच पहिला मानकरी आहे आणि भारतरत्न सन्मानाचा सचिनइतकाच प्रबळ दावेदार.

सचिन आणि आनंदप्रमाणेच भारताच्या अनेक वीरांनी क्रीडाक्षेत्रात तिरंगा फडकवत ठेवलाय. १९९६मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेसनं टेनिसचं कांस्य पदक जिंकलं होतं. तर २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर करणम मल्लेश्वरीनं कांस्यपदकाची कमाई केली. २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये  राज्यवर्धन राठोडनं रौप्य पदक मिळवलं होतं. तर २००८ साली बीजींगमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राचं सुवर्णपदक तसंच कुस्तीवीर सुशील आणि बॉक्सर विजेन्दरच्या कांस्यपदकांनी देशभर नवा उत्साह संचारला…

आज जगात भारताचा दबदबा निर्माण झालाय. एक मोठी बाजारपेठ, नवी आर्थिक सत्ता म्हणून देशाकडे पाहिलं जातं. आजही जगात भारताचा चेहरा बनू शकेल असा एकही नेता देशाकडे नाही. त्याचवेळी खेळाडू भारताचे खरे प्रतिनिधी म्हणून जगापुढे आलेयत.

एकट्या सचिनचंच उदाहरण पुरेसंय. आपल्या खेळानं त्यानं भारतातच नाही तर परदेशातही क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकलीयत. क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या परिघाबाहेरही सचिनची कीर्ती पोहोचलीय. टेनिस सम्राट रॉजर फेडररला सचिनचा खेळ आवडतो, जर्मनीत क्रिकेट कुणाला फारसं माहित नाही, पण मायकल शूमाकरला सचिन माहिती आहे. फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ उसेन बोल्टनं तर आपण डायहार्ड सचिन फॅन असल्याचं कबूलही केलंय.

भारतीय खेळाडूंनी आपल्या देशाला जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलंय. जगभरच्या मीडियात भारताचं नाव आधी गाजायचं ते दुष्काळ, दहशतवादी हल्ले, गरिबी यांसारख्या गोष्टींनी. पण आता तिथेच भारतीयांची अभिमानगाथा झळकते आणि त्यातही खेळाडू आघाडीवर आहेत.

तसंतर खेळाडूंच्या सन्मानासाठी क्रीडा पुरस्कारांची तरतूद आहे. पण अनेक खेळाडूंचं कर्तृत्व, त्यांनी दिलेली प्रेरणा फक्त मैदानापुरतीच मर्यादित नाही. अनेक खेळाडूंना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. आणि भारतरत्नसाठीही खेळाडूंचा विचार व्हावा अशी शिफारस होतेय हे स्वागतार्हच आहे..

खेळाडूंनाही भारतरत्न द्यायचं निश्चित झालं तर पहिल्यांदा हा सन्मान कुणाला द्यायचा? सचिन तेंडुलकरला की, विश्वनाथन आनंदला? ही नवी चर्चा मात्र यामुळे सुरू झालीय.. दोघांचे खेळ वेगळे आहेत. आणि म्हणूनच दोघांची तुलना कधीच करता येणार नाही. पण खेळाडूंसाठी पहिल्या भारतरत्नचा मानकरी ठरवायचा झाला लोकप्रियतेच्या निकषावर कदाचित सचिन आनंदला मागे टाकू शकतो.

– जान्हवी मुळे

Advertisements