सचिन तेंडुलकर आणि रॉजर फेडरर.. एक क्रिकेटचा शहेनशाह… तर दुसरा टेनिसचा सम्राट…
आपापल्या खेळांचे हे महानायक शनिवारी एकत्र आले. हा योग जुळून आला विम्बल्डनच्या सेंटर कोर्टजवळ.
विम्बल्डनच्या प्रथेनुसार निवडक स्पोर्टस स्टार्सना सेंटर कोर्टवरच्या सामन्यांसाठी आमंत्रित केलं जातं. यंदाही सचिननं ही संधी चुकवली नाही. मास्टर ब्लास्टरनं शनिवारी पत्नी अंजलीसोबत सेंटर कोर्टच्या रॉयल बॉक्समधून टेनिसचा आनंद लुटला. त्यानं आधी कॅरोलिन वोझ्नियाकी आणि मग चक्क रॉजर फेडररला विजय साजरा करताना पाहिलं. फेडररनं  डेव्हिड नॅलबॅण्डियचा 6-4, 6-2, 6-4 असा  पराभव केला आणि नंतर सचिनची भेट घेतली…
दोघांमध्ये नेमकी काय बातचीत झाली याचा तपशील मिळू शकलेला नाही. पण ही भेट झाल्यावर सचिननं ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या…. ‘रॉयल बॉक्सच्या बाल्कनीत फेडररबरोबर एक तास गप्पा मारल्या. अगदी विनम्र माणूस. आणि हो, त्याला क्रिकेटबद्दल बरंच काही ठावूक आहे.’ अशा शब्दात सचिननं या भेटीचं वर्णन केलंय.
आपापल्या खेळांमध्ये यशाचं शिखर गाठणारे सचिन आणि फेडरर.. म्हटलं तर अगदी एकमेकांसारखे वाटतात..
दोघांच्या खेळात नैसर्गिकता, नजाकत, आक्रमकता ठासून भरलीय.दोघांनीही मेहनत आणि फिटनेसच्या जोरावर आपापल्या खेळात बराच काळ दबदबा कायम ठेवलाय. क्रिकेट पीचवर सचिन आणि टेनिस कोर्टवर फेडररला रोखणं कधीच सोपं नसतं. पण त्यापलिकडेही दोघांचा विनम्र स्वभाव नेहमीच लक्ष वेधून घेतो. घरच्यांचा पाठिंबा, चाहत्यांचं प्रेम आणि समाजासाठी बांधिलकी ह्याही गोष्टी अगदी एकसारख्यायत…
सचिनचं टेनिस प्रेम तसं सर्वांनाच माहीत आहे.. लहानपणी मास्टर ब्लास्टरला टेनिस खेळण्याची भारी हौस होती. छोटा सचिन, टेनिस लीजंड जॉन मॅकेन्रोचा मोठा चाहता होता. इतका, की त्याची नक्कलही करायचा. सचिननं टेनिसऐवजी क्रिकेटची निवड केली आणि विक्रमांचे डोंगर उभे केले. पण टेनिसला त्याच्याही हृदयात वेगळं स्थान आहे.
तर दुसरीकडे रॉजर फेडररही क्रिकेटचा चाहताय. फेडररची आई लिनेट मूळच्या साऊथ आफ्रिकेतल्या. क्रिकेटप्रेमाचा वारसा फेडररला तिथूनच मिळाला. ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनदरम्यान, तसंच भारतभेटीवर फेडरर मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. आणि आजही क्रिकेटविश्वातल्या घडामोडींवर त्याचं लक्ष असतं. म्हणूनच सचिनची भेट फेडररसाठीही खास ठरली..
मास्टर ब्लास्टरनं विश्वविजयाचं स्वप्न साकार करण्याठी २१ वर्षा त्याच तन्मयतेनं खेळ केला. फेडररही त्याच वाटेवरून चालतोय.. सचिनच्या भेटीनं फेडररलाही सातवं विम्बल्डन जिंकण्यासाठी प्रेरणा दिली असेल.
– जान्हवी मुळे
Advertisements