क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन, हॉकीमध्ये ध्यानचंद, फुटबॉलमध्ये पेले किंवा टेनिसमध्ये रॉड लेव्हरचं जे स्थान आहे तेच बॅडमिन्टनमध्ये रुडी हर्टोनोचं..

रुडी हर्टोनो.. हे नाव आजवर फक्त ऐकून ठावूक होतं.

त्यांचा खेळ पाहण्याचा प्रश्नही येत नाही. रुडी जेव्हा जग गाजवत होते, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. फक्त त्यांच्याबद्दल थोडंफार वाचलं होतं. पण सोमवारी त्यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांच्याचकडून त्यांची कहाणीही ऐकायला मिळाली.

त्या काळातल्या बहुतेक अँथलीट्सप्रमाणे रूडींच्या जडणघडणीमागे मुख्य कारण ठरलं त्यांच्या वडिलांचं अधुरं स्वप्न. वडिलांकडून रुडीला फक्त बॅडमिन्टनचा वारसाच मिळाला नाही, तर योग्य वेळी मार्गदर्शन आणि आधारही मिळाला. लहानपणी रुडीला तसे बरेच खेळ आवडायचे पण बॅडमिन्टनवर त्याचं विशेष प्रेम होतं.

सात-आठ वर्षांच्या रुडीला वडिलांनी एके दिवशी विचारलं, “तुला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय?”

रुडी – “वर्ल्ड चॅम्पियन? म्हणजे मग काय होईल?”

“वर्ल्ड चॅम्पियन झालास की तुला सगळं काही मिळेल. मोठ्ठं घर मिळेल, दूर दूरच्या देशांत जाता येईल, सगळे तुझं कौतुक करतील, तुला हवं ते करता सगळ येईल…”

“मला आवडेल वर्ल्ड चॅम्पियन व्हायला. पण कसं होणार वर्ल्ड चॅम्पियन”

“तुला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय ना, ठीक आहे, मग उद्या सकाळी लवकर उठायचं. पाच वाजता.” “पाच वाजता ?”

“हो. आणि आपण सरावाला सुरूवात करायची…”

हा संवाद तिथेच थांबला नाही.  दुस-या दिवशी रुडी लवकर उठला. वडिलांबरोबर फिटनेस ट्रेनिंगसाठी निघाला. छोटा रुडी धावायचा तेव्हा वडिल झुलकारनैन कुर्निवान त्याच्यासोबत सायकल चालवायचे. मुलाला सोबत व्हायची आणि सायकलशी स्पर्धा केल्यानं त्याचा वेगही वाढायचा.

रूडीला त्याच्या वडिलांनी, झुलकारनैन यांनी मंत्र दिला होता – वेग, उत्तम श्वासोच्छ्वास, सातत्य आणि आक्रमकता..

रुडीनं हा मंत्र आयुष्यभर पाळला आणि पुढे तेच त्याच्या यशाचं गमक बनलं. ते राहात त्य़ा सुराबाया शहारात रेल्वे स्टेशनजवळ सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर दिवसा आणि रात्री केरोसिन लाईट्समध्ये रुडीचा सराव चालायचा.

सुराबायामध्ये वडिलांकडून प्राथमिक ट्रेनिंग घेतल्यावर रुडीनं स्थानिक स्पर्धा गाजवायला सुरूवात केली आणि हळूहळू राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. 1967मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी रुडीनं पहिल्यांदा मानाची ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकली आणि १९७४ पर्यंत सलग सात वर्ष या स्पर्धेवर राज्य केलं.

निवृत्तीनंतरही रूडींनी जकार्तामध्ये बॅडमिन्टन अॅकॅडमी सुरू केलीय. आपल्या देशातच नाही तर जगभरातील बॅडमिन्टनपटूंसाठी रूडी प्रेरणास्थान आहेत. प्रकाश पडुकोणनी त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली आणि मग प्रकाश, पुलेला गोपीचंद, सायना नेहवाल अशी परंपरा भारतात सुरू झाली.

अख्ख्या जगानं मान तुकवावी अशी माणसं कमीच आहेत या जगात. आणि त्यातही अहंकाराचा अजिबात लवलेश नसलेला विरळाच. म्हणूनच रूडीना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाल्यानं फार आनंद वाटला.

आणि त्याचवेळी बॅडमिन्टनच्या दुनियेबाहेर, आजच्या पिढीला, रूडींविषयी फारसं माहीत नाही याचीही जाणीव झाली. म्हणूनच त्यांची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. आणि फक्त खेळाडूंनाच नाही, तर तुम्हा आम्हालाही रूडीकडून खूप काही शिकण्यासारखंय, नाही का?

———-

रूडी हर्टोनो

१. ऑल इंग्लंड बॅडमिन्टन जेतेपदं-

१९६८, १६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४ आणि १९७६

उपविजेतेपद- १९७५, १९७८

२. विश्वविजेतेपद – १९८०

३. सांघिक विश्वविजेतेपदं (इंडोनेशिया) – १९७०, १९७३, १९७६, १९७९

Advertisements