पॅरीसचं रोलँ गॅरो स्टेडियम सज्ज झालंय वर्षातल्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी.. फ्रेन्च ओपन २०११ला रविवारपासून सुरू होतेय. क्ले कोर्ट वरच्या या टेनिस स्पर्धेचं यंदाचं एकशेदहावं वर्षय.

राफेल नदाल, नोवाक ज्योकोविच की रॉजर फेडरर.. यंदाच्या फ्रेन्च ओपनमध्ये रंगणार आहे अशी तिरंगी लढाई…

यंदा अपेक्षेप्रमाणेच पुरूष एकेरीत गतवेळाचा विजेता नदालला अव्वल मानांकन मिळालंय. पण  ५ वेळचा चॅम्पियन नदालपेक्षाही यंदा सर्वांच्या नजरा असणार आहेत दुसऱ्या मानांकित नोवाक ज्योकोविचवर.

सर्बियाच्या या सुपरस्टारनं यंदाच्या मोसमात एकही सामना गमावला नाहीए. ज्योकोविचनं यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसह ७ जेतेपदं खिशात टाकलीयत आणि सलग चार वेळा राफेल नदालवर मात केलीय. सुपर सर्ब नोवाक आता पॅरिसच्या लाल मातीत नदाल आणि फेडररचं राज्य मोडून काढण्यासाठी उत्सुक आहे.

जेतेपदाच्या शर्यतीत नदाल आणि ज्योकोविचप्रमाणेच रॉजर फेडररलाही विसरून चालणार नाही. २००९चा विजेता फेडरर यंदा तिसऱ्या स्थानावर घसरला असला तरी क्ले कोर्टवर त्यानं यंदा चांगला खेळ केलाय.

महिला एकेरीत अव्वल मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकी आणि दुसरी मानांकित किम क्लायस्टर्स जेतेपदाच्या सर्वात प्रबळ दावेदार आहेत. डेन्मार्कच्या वोझ्नियाकीला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठूनही आतापर्यंत एकही ग्रँड स्लॅम जिंकता आलेलं नाही. तर सुपर मॉम किम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यावर दुखापतीमुळं काही दिवस टेनिसपासून दूर राहिली होती.

रशियन ब्युटी मारिया शारापोव्हालाही स्पर्धेआधीच सूर गवसलाय. शारापोव्हानं आपल्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. करियर स्लॅम पूर्ण करण्यासाठी शारापोव्हाला फ्रेन्च ओपनच्या जेतेपदाची आवश्यकताय. दरम्यान सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स सिस्टर्सनीही स्पर्धेतून माघार घेतल्यानं महिला गटातली चुरस आणखी वाढलीय. त्यामुळं यंदाही पॅरिसमध्ये एखादा सरप्राईज रिझल्ट पहायला मिळू शकतो. गेल्या वर्षीही सगळे अंदाज चुकवत फ्रान्सेस्का स्कियावोननं जेतेपद मिळवलं होतं.

भारतीयांपुढे मोठं आव्हान

फ्रेन्च ओपनच्या पुरूष एकेरीत सोमदेव देववर्मन आणि महिला एकेरीत सानिया मिर्झाच्या कामगिरीवर भारतीयांची नजर असेल. मात्र दोघांचाही मार्ग अजिबात सोपा नाहीये. जागितिक क्रमवारीत सहासष्टाव्या स्थानावर असेलल्या सोमदेवला पहिल्याच फेरीत क्रोएशियाच्या वर्ल्ड नंबर वन इवान ल्य़ुबिसिचचा सामना करायचाय. तर सानिया मिर्झासमोर आव्हान असणारेय जर्मनीच्या क्रिस्टिना बरवाहचं.

तर लिअँडर पेस आणि महेश भूपती ही भारतीय जोडी एका दशकानंतर पुन्हा एकदा पॅरीसमध्ये खेळायला उतरणार आहे. 1999 आणि २००१ मध्ये या जोडीनं फ्रेन्च  ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. पेस-भूपतीबरोबरच भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी या जोडीवरही सर्वांच लक्ष राहील.

Advertisements