महेन्द्रसिंग धोनीचा लाँग ऑनला षटकार ठोकला आणि वानखेडे स्टेडियमच नाही, तर अख्खा भारत देश विजयाच्या जल्लोषात बुडून गेला..

रफ अँड टफ युवराज सिंगही आनंदानं रडू लागला, पराभवाचे अश्रू आवरत कुमार संगकारानं धोनीचं अभिनंदन केलं. अख्खी भारतीय टीम सेलिब्रेशनसाठी मैदानात उतरली..

एखाद्या लहान मुलासारखी सचिन तेंडुलकरनं मैदानावर धाव घेतली आणि मधली अठ्ठावीस वर्ष जणू गळून पडली.

भारत पुन्हा एकदा वन डे क्रिकेटच्या सिंहासनावर आऱूढ झालाय.

१९८३मध्ये कपिल्स डेव्हिल्सनी क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड््सवर विश्वविजय साजरा केला होता. शनिवारी मुंबईत, भारतीय क्रिकेटच्या पंढरीत धोनी ब्रिगेडनं इतिहास रचला..

आजवर १९८३च्या विश्वविजयाच्या अनेक कहाण्या ऐकल्या होत्या. त्या ऐकतच मी मोठी झाले. आता सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आमच्याही पिढीकडे आहेत. अभिनव बिन्द्राचं गोल्ड मेडल असो, सायना नेहवाल असो, पेस-भूपती-सानिया-सोमदेव असोत किंवा विश्वनाथन आनंद.. सगळ्यांच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. पण धोनी ब्रिगेडचा विजय त्याहीपेक्षा मोठा ठरलाय.

भारत जिंकल्यावर आमच्या न्यूजरूममध्येही सगळ्यांनी उड्या मारत, आरोळ्या ठोकत, एकमेकांचं अभिनंदन केलं. लगेचच आम्ही कामालाही लागलो. पण आपली टीम वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे याचं realization होण्यासाठी थोडा वेळच लागला.

ती जाणीव झाली घरी परतताना. रात्री उशीरापर्य्ंत जागण्याची मुंबईला सवयच आहे. गर्दी इथं नेहमीच असते. पण शनिवारी त्या गर्दीलाही तिरंग्याचा रंग चढला होता. पहाट होत आली तरी रस्त्या-रस्त्यावर, गल्ली-गल्लीत तिरंगा फडकत होता, व्हिक्टरी रॅलीज सुरू होत्या.

आमच्या सोसायटीच्या वॉचमनदादांशी एरवी फारसं बोलणं होत नाही. घरी जाता-.येता ते हात उंचावतात कधी-कधी. जणू मी आहे असं सांगण्यासाठी. पण त्या दिवशी रात्री त्यांचा चेहराही उत्साहानं फुलला होता. “मॅच देखा आपने?  हम जीत गए..” त्यांनी आनंदानं सांगितलं.

त्या रात्री बराच वेळ झोप लागली नाही. पत्रकार म्हणून नाही, तर क्रिकेट फॅन म्हणून विश्वविजयाचा आनंद साजरा करावासा वाटला.

दिवस उजाडला, २४ तास उलटून गेले तरी सगळीकडे उत्सवाचं वातावरण कायम.. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू.

कुणी म्हणेल, पंधरा क्रिकेटर्ससाठी अख्ख्या देशानं वेडं का व्हावं? हे क्रिकेटवरचं प्रेम नाही, हा तर फक्त पोकळ देशाभिमान, असंही कुणी म्हणेल.

पण अख्ख्या देशाला वेड लावण्यापेक्षाही धोनी ब्रिगेडनं साधली आहे एक अशक्य गोष्ट. टीम इंडियानं आम्हाला जाणीव करून दिलीय आमच्यातल्या ताकदीची आणि हिंमतीची. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर कोणतीही गोष्ट मिळवता येते याची.

आणि टीम इंडियानंच दाखवून दिलीय नव्या भारताची झलक. असा भारत जिथे यशाचा मार्ग फक्त शहरातच नाही, तर गावांतही सापडतो. असा भारत जिथले तरूण कोणताही धोका पत्करायला तयार आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची जिद्द आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत डगमगून जात नाहीत. दोनशे पंचाहत्तरच काय, कितीही मोठा डोंगर पार करता येईल हा आत्मविश्वास…

टीम इंडियाच्या एका विजयानं एकशेवीस कोटी लोकांना नवी उमेद मिळालीय. फक्त सेलिब्रेशनपुरताच हा जोष मर्यादित राहू नये असंच वाटतं. विश्वविजय.. जगज्जेतेपद.. तेव्हाच ख-या अर्थानं सिद्ध होईल.

– जान्हवी मुळे

Advertisements