मोटेराच्या मैदानात भारतानं विजय मिळवला. पण ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूनं भारतीयांची मनं जिंकली. ब्रेट ली.  भारताचा विजय जवळपास निश्चित झालेला असतानाही लीनं खांदे पाडले नव्हते. त्यातच बाऊंडरी-लाईनवर बॉल अडवण्यासाठी लीनं जमिनीवर झेप घेतली. त्याला बाऊंडरी अडवता आली नाहीच, पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे बॉल थेट त्याच्या चेह-यावर आदळला. लीच्या उजव्या भुवईजवळ जखम झाली आणि मग रक्तही वाहू लागलं. वेदना लीला झाल्या, पण अख्खं स्टेडियमच कळवळलं. मलमपट्टी करण्यासाठी ली ड्रेसिंग रूममध्ये गेला. पण त्यानंतर पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. तेव्हा हजारो चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं. लीच्या दुर्दैवानं सामना आधीच ऑस्ट्रेलियाच्या हातून निसटला होता आणि त्याच्याच गोलंदाजीवर भारतानं विजय साजरा केला..

ब्रेट लीला ती ओव्हर टाकताना पाहून आठवण झाली ती अशाच काही खेळाडूंची ज्यांनी संघाला गरज असताना दुखण्याचा बाऊ केला नाही. पाय लंगडत असतानाही बोलिंग करणारा कपिल देव, दाढ ठणकत असतानाही सुनील गावसकर यांनी केलेली खेळी, वेस्ट इंडीजमध्ये जबडा बँडेजमध्ये असतानाही गोलंदाजी टाकणारा अनिल कुंबळे, सिडनी टेस्टमध्ये कानशिलावर बॉल आदळून रक्त निघाल्यावरही खेळत राहणारा राहुल द्रविड, पाकिस्तानविरुदध २००३च्या विश्वचषकात पायात गोळे आल्यावरही खेळत राहणारा सचिन… या आणि अशाच अनेक खेळाडूंनी दाखवून दिलंय क्रिकेटवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय असतं..

Advertisements