पडलेले खांदे, चेह-यावर हरवल्यासारखे भाव, खाली झुकलेली नजर… ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सना कधी अशा अवतारात पाहिल्याचं आठवतंय? निदान गेल्या बारा वर्षांत तरी नाही. पण अहमदाबादमध्ये गुरूवारी तेच चित्र दिसलं.

विश्वचषकावर अधिराज्य गाजवणा-या कांगारूंची सत्ता संपलीय. भारतानं त्यांना विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. आता काळजीवाहू सरकारसारखंच ऑस्ट्रेलिया केवळ नाममात्र वर्ल्ड चॅम्पियन आहे, ते सुद्धा फक्त काही दिवसांसाठीच.

२ एप्रिलला आता मुंबईत होण-या अंतिम सामन्यात क्रिकेटचा पुढचा चॅम्पियन कोण ते ठरेल. पण ऑस्ट्रेलियानं ते सिंहासन आता गमावलंय.

गेली बारा वर्ष फक्त विश्वचषकावरच नाही, तर क्रिकेटच्या जगातच ऑस्ट्रेलियाचं राज्य होतं. भारतानं गेल्या दशकात हळूहळू त्या साम्राज्याला धक्के द्यायला सुरूवात केली. आणि यंदा टीम इंडियानंच ऑस्ट्रेलियाचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आणलंय. कांगारूंची क्रिकेटवरची एकाधिकारशाही संपण्याची सुरूवात आधीच झाली होती. त्यावर ह्या सामन्यानं शिक्कामोर्तब केलंय.

फक्त भारताविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याचा विचार करायचा तर कांगारूंची गोलंदाजी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. पेस बोलर्स असोत वा स्पिनर्स. कांगारूंच्या बोलिंगमध्ये तो डंख जाणवला नाही. नाथन हॉरित्झ आणि झेवियर डोर्टी हे कांगारूंचे दोन फिरकी गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. साहजिकच फिरकी गोलंदाजीत पॉण्टिंगपुढे फारसे स्पेशलिस्ट पर्याय नव्हते. ब्रेट लीसारखा गोलंदाज एकाकी पडल्यासारखा वाटला. त्यातच भारतानं ऑस्ट्रेलियाला फक्त २६० धावांत रोखून निम्मी लढाई आधीच जिंकली होती. त्याआधीही श्रीलंकेविरुद्धचा सामना रद्द झाल्यापासून ऑस्ट्रेलियाची लयच बिघडली होती. पराभवाची अशी अनेक कारणं कांगारूंना देता येतील.

पण मुळात ऑस्ट्रेलियाचा वावर म्हणजे एखाद्या थकून गेलेल्या वनराजासारखाच वाटला.

नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलियाला, क्रिकेटच्या अनभिषिक्त सम्राटांना पायउतार का व्हावं लागलं? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण थोडा थोडका नाही तर तब्बल दोन दशकांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियानं क्रिकेटवर राज्य केलं.

१९८७ साली कांगारूंनी पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवलं. मग ९०च्या दशकात ऑस्ट्रेलिया क्रिकेटची महासत्ता बनली. १९९९, २००३ आणि २००७ अशा तीन सलग विश्वचषकात कांगारूंनी विजय मिळवला. दोन वेळा सलग १६ टेस्ट मॅचेसमध्ये विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीवर सलग दोनदा कब्जा, ऑस्ट्रेलियाची क्रिकेटवरची पकड किती घट्ट होती ते दाखवून देणा-या या गोष्टी.  वन डेच्या मैदानात तर कांगारूंना हरवणं म्हणजे केवळ अशक्यच भासायचं.

पण त्याच ऑस्ट्रेलियाची गेल्या दोन वर्षांत सातत्यानं घसरण होताना दिसली. पॉण्टिंगच्या नेतृत्वाखाली एकदा नाही तर दोनदा ऑस्ट्रेलियानं अँशेस मालिका गमावली. भारताविरुद्धची बोर्डर गावसकर ट्रॉफीही त्यांच्या हातातून गेली. आणि आता विश्वचषकही गमावला. असं का व्हावं?

तेव्हाची आणि आताची टीम पाहिल्यावरच फरक स्पष्ट होतो.  ऑस्ट्रेलियाला यशाच्या शिखरावर नेण्यात स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न, अडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, ग्लेन मॅग्रा, जेसन गिलेस्पी अशा खेळाडूंचा महत्वाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ती गोल्डन जनरेशन निवृत्त झाली, तसं कांगारूंचं बळ कमी होत गेलं. एरवी नसानसांत खेळ भरलेल्या ऑस्ट्रेलियात टॅलेण्टेड क्रिकेटर्सची कमी नाही. क्रिकेट तयार करणा-या या फॅक्टरीनं टीमला रिप्लेसमेंट्सची कमी पडू दिली नाही. एका खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी दुसरा तितकाच तयार असायचा. पण एकापाठोपाठ एक दिग्गज खेळाडूंनी एक्झिट घेतल्यावर निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. रिकी पॉण्टिंग, ब्रेट लीसारखे जुने शिलेदार किल्ला लढवतायत. पण ती झुंज एकाकीच ठरतेय.

पॉण्टिंगच्या नेतृत्वाचंही हे अपयश म्हणायला हवं. दिग्गज, ताकदवान खेळाडूंच्या संघाचं नेतृत्व करणं आणि नव्यानं संघ उभा करणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. उत्तम कर्णधार आणि महान कर्णधारामधला तोच महत्वाचा फरक. रिकी पॉण्टिंगच्या नेतृत्वाला महानतेचं वलय मिळू शकलं नाही ते त्यामुळंच. आता पॉण्टिंगला हटवा अशी मागणी ऑस्ट्रेलियात जोर धरू लागलीय. पण केवळ पॉण्टिंगच्या जाण्यानं परिस्थिती बदलणार नाहीय. ऑस्ट्रेलियानं त्यातून मार्ग काढलाच तर क्रिकेटमधली चुरस आणखी वाढेल हे नक्की.

बाकी ऑस्ट्रेलियाचा पडता काळ खरंतर केव्हापासूनच सुरूय. पण केवळ ऑस्ट्रेलिया आहे, म्हणून पडण्यासाठी इतका वेळ लागला. आणि ऑस्ट्रेलिया आहे म्हणूनच त्यांना संपल्यात जमा धरता येत नाही.

एखाद्या मोठ्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एक व्हिक्टरी साँग गातात.

Under the Southern Cross I Stand

A sprig of wattle in my hand,

A native of my native land,

Australia you little beauty…

विश्वचषकाच्या फायनलमध्ये यंदा हे स्वर घुमणार नाहीत. पण म्हणून हे गाणं हरवलेलं नाही, हेही लक्षात ठेवायला हवं.

– जान्हवी मुळे

 

Advertisements