नॉक आऊट राऊंड सुरू झाला. आता ख-या अर्थानं विश्वचषकाची सुरूवात झाली असं अनेकजणांना वाटतं. चुरस आणि स्पर्धेचा विचार करता ते खरंही आहे. पण यंदा लीग स्टेजचे सामनेही तितकेच रंगतदार ठरले. कारण आयर्लंडसारख्या संघांची आणि केविन ओब्रायन, हिरल पटेल, रायन टेन डेस्कॉतेसारख्या खेळाडूंची कामगिरी.

त्यातही आयर्लंडची कहाणी म्हणजे एखाद्या परीकथेसारखीच म्हणायला हवी.

गेल्या विश्वचषकापर्यंत आयर्लंडचे क्रिकेटर्स पार्टटाईम क्रिकेटर्स होते. म्हणजे आपली नोकरी-धंदा सांभाळून, क्रिकेटवरच्या प्रेमापोटी खेळायचे. पण २००७मध्ये पाकिस्तानवर मात आणि सुपर एट स्टेजमधला प्रवेश यांनी आयरिश क्रिकेटचं चित्र पालटलं. आयर्लंडच्या क्रिकेटर्सना बोर्डानं त्यांना करारबद्ध केल्यानं त्यांना आता केवळ खेळावरच लक्ष देणं शक्य झालं. गेल्या चार वर्षांत आयरिश टीमला मोठ्या संघांविरुद्ध फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत. ना त्यांचं नाव कुठे गाजताना दिसलं. पण यंदा पुन्हा एकदा आयर्लंडकडे सर्वांच्या नजरा होत्या आणि त्यांनी आपल्या चाहत्यांना बिलकुल निराश केलं नाही. आयरिश संघांचा मैदानातला वावरच चैतन्यपूर्ण होता. कदाचित कोणताही दबाव नसल्यानं असेल, पण क्रिकेटचा आनंद कसा लुटावा हे त्यांच्याकडे पाहून जाणवतं.

आयर्लंडनं इंग्लंडवर केलेली मात हा विश्वचषकातला सर्वात मोठा अपसेट. केविन ओब्रायनचं विश्वचषकातलं सर्वात जलद शतक, विश्वचषकातील सर्वाधिक ३२७ धावांचा यशस्वी पाठलाग, ही त्या विजयाची गोडी वाढवणारी आकडेवारी. आम्हीही आहोत इथं असं मोठ्या संघांना ठणकावून सांगणारी.

दुर्दैव इतकंच की आयर्लंडचा अपवाद वगळता इतर छोट्या संघांमध्ये तशी धमक दिसली नाही. अगदी बांगलादेश, झिम्बाब्वेमध्येही.

बांगलादेशानं तर हातातली संधी गमावली असंच म्हणायला हवं. वेस्ट इंडीजसमोर त्यांनी अगदी हातपाय गाळले नसते, तर कदाचित आजही त्यांचा संघ विश्वचषकाच्या शर्यतीत असता. बांगलादेशामध्ये खरंतर टॅलेण्टची अजिबात कमी नाही. मात्र एका विजयासाठी आवश्यक असणारी चिकाटी आणि सातत्य थोडं कमी पडतं.

झिम्बाब्वे आणि केनियाचीही तीच गत आहे. बांगलादेशात निदान क्रिकेटर्सना पैलू पाडणारी व्यवस्था तरी उभी आहे. मात्र झिम्बाब्वे आणि केनियाच्या ढासळत्या परिस्थितीबरोबरच तिथल्या क्रिकेटचीही पिछेहाट होताना दिसतेय. एकेकाळी हिथ स्ट्रीक, हेनरी ओलंगा, फ्लॉवर बंधूंचा ताकदवान झिम्बाब्वे संघ आज चाचपडताना दिसतो. केनियाचंही तसंच. केनियाला यंदा एकही सामना जिंकता आला नाही. कॅनडाकडूनही त्यांचा पराभवच झाला. त्यांचा खेळ पाहून केनियानं २००३मध्ये सेमी फायनल गाठली होती यावर विश्वास बसत नाही.

तुलनेनं नेदरलँड्स आणि कॅनडाची कामगिरी आशेचा कीरण ठरलीय. हे दोन संघ विश्वचषकात आहेत याचा खरंतर कोणी फारसा विचारही करत नव्हतं. जणू तेरावी आणि चौदावी जागा भरून काढण्यासाठीच फक्त त्यांना स्थान मिळालं. कॅनडानं एक विजय मिळवला तर नेदरलँड्सची झोळी रिकामीच राहिली. मात्र त्यांच्या काही खेळाडूंनी आश्वासक कामगिरी बजावली.  सर्वात लक्षणीय ठरले ते नेदरलँड्सचा रायन टेन डेस्कॉते आणि कॅनडाचा हिरल पटेल. डेस्कॉतेनं नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं, तर हिरल पटेलनं ऑस्ट्रेलियालाही टक्कर देण्याची हिंमत दाखवली. या दोन्ही खेळाडूंना आणि त्यांच्या संघांना अजूनही बराच पल्ला गाठायचाय.

एक मात्र खरं, एरवी क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे न दिसणा-या देशांना विश्वचषकाचं मोठं व्यासपीठ मिळालं होतं. आयसीसी विश्वचषकातील संघांची संख्या कमी करण्याच्या विचारात असल्यानं कदाचित पुढच्या विश्वचषकात छोट्या संघांचा पत्ता कट झालेला असेल. म्हणूनच यंदाचा विश्वचषक छोट्या संघांसाठी महत्वाचा होता. आयर्लंडचा अपवाद वगळता इतर संघांना त्याचा फारसा फायदा उठवता आलेला नाही.

– जान्हवी मुळे

Advertisements