केविन ओब्रायनच्या शतकानं फक्त त्याच्या टीमलाच नाही, तर अख्ख्या आयर्लंडला दिलाय एक नवा आत्मविश्वास.

एरवी आयर्लंडमध्ये तिथल्या राजकीय घडामोडी आणि ढासळती अर्थव्यवस्था यांचीच चर्चा सुरू असायची. पण २ मार्चनंतर हे चित्र बदललं. आयर्लंडमध्ये आता उत्साहाचं वातावरण पसरलंय. आणि ही किमया साधलीय आयरिश क्रिकेट टीमनं. सलग दुसऱ्या विश्वचषकात आयर्लंडनं धक्कादायक विजयांची नोंद केलीय.

 

२००७ मध्ये विश्वचषकात पहिल्यांदाच खेळताना झिम्बाब्वेशी बरोबरी, पाकिस्तान आणि बांगलादेशवर विजय, आणि यंदा चक्क इंग्लंडवर मात… ही आहे आयर्लंडची कामगिरी.

 

परीकथांचा, रहस्यांचा गूढ देश म्हणून आयर्लंड प्रसिद्धय. आणि याच आयर्लंडनं लिहिली आहे क्रिकेटमधली आणखी एक सुंदर परीकथा. आयरिश क्रिकेट आता एकदम प्रकाशझोतात आलंय. पण एरवी इंग्लंडच्या अगदी जवळ असूनही क्रिकेटविश्वात पाय रोवण्यासाठी आयर्लंडला उशीरच झाला. कारण ठरली तिथली राजकीय परिस्थिती.

 

इंग्लंडच्या शेजारी असलेल्या ह्या बेटावर एकेकाळी इंग्लंडनं राज्य केलं होतं. पण कडवा संघर्ष आणि गृहयुद्धानंतर 1921 मध्ये आयर्लंडला स्वातंत्र्य मिळालं.. नॉर्दन आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड अशा दोन देशांत आयर्लंडची फाळणी झाली. नॉर्दन आयर्लंडनं ब्रिटिश अधिपत्याखाली युनायटेड किंग्डममध्ये प्रवेश केला. पण इंग्लंड आणि आयर्लंडमधली तेढ अर्थातच टिकून राहिली.

 

रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये फॉरिन गेम्सवर, खास करून इंग्लिश खेळांवर बंदी घालण्यात. आयरिश क्रिकेटला त्याचा फटका बसला.

 

पण १९९०च्या दशकात जागतिकीकरणानंतर चित्र पालटलं. १९९३ मध्ये आयर्लंडला आयसीसीत स्थान मिळालं. रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि नॉर्दन आयर्लंडची मिळून एकच क्रिकेट टीम तयार करण्यात आली आणि चौदा वर्षांतच म्हणजे २००७ साली त्यांचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला. इतकंच नाही तर त्यांनी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.

 

ते यश तात्पुरतं नव्हतं हे आयर्लंडनं यंदा पुन्हा सिद्ध केलंय.

 

तसं पहायला गेलं आयर्लंड आणि भारतामध्येही जिव्हाळ्याचं नातंय. दोन्ही देशांच्या इतिहासाची काही पानं एकत्र लिहिली गेली आहेत. आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याला लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक भारतीय नेत्यांचा पाठिंबा होता. सुभाषचंद्र बोसही आयरिश नेत्यांच्या संपर्कात होते. तर अनेक आयरिश विचारवंतांनी आणि नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. मूळच्या आयरिश असलेल्या अॅनी बेझंट यांनी तर होमरूल लीगची स्थापना करून भारताच्या स्वातंत्रलढ्यात सक्रीय सहभागही घेतला होता.

 

ही देवाणघेवाण फक्त राजकीय पातळीवरच नव्हती. दोन देशांमध्ये त्या काळात सांस्कृतिक नातंही जोडलं गेलं होतं. भारताचे पहिले नोबेलविजेते रविन्द्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ची प्रस्तावना लिहिलि आहे ती आयर्लंडच्या प्रसिद्ध लेखक वॉल्टर बी यिट्स यांनी.

 

आजही आयर्लंड आणि भारताचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध कायम आहेत. मात्र क्रिकेटच्या मैदानात विश्वचषकात दोन्ही देशांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. यावेळी आयर्लंडला कमी लेखण्याची चूक कोणताच भारतीय करणार नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामनाही अगदी जबरदस्त होईल अशीच क्रिकेट फॅन्सना आशा वाटतेय.

 

त्याही पुढे जायचं तर आयर्लंडसाठी ही एक खूप मोठी संधी ठरणार आहे. एकीकडे झिम्बाब्वे, केनिया आणि बांगलादेशासारखे गडी कोसळतायत. आणि त्यात आयर्लंडची टीम दमदार कामगिरी बजावतेय. ही गोष्ट विसरता येणार नाही.

 

आयसीसी पुढच्या विश्वचषकात १४ ऐवजी दहाच टीम्स खेळवण्याच्या विचारात आहे. पण आयर्लंडसारख्या संघांवर त्यामुळं अन्याय होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे विश्वचषकात खेळणाऱ्या संघांची रणजी ट्रॉफीप्रमाणे दोन गटांत विभागणी करता येईल.

 

आयसीसी काय निर्णय घेतेय ते मे महिन्यातच कळेल पण आयर्लंडच्या धडाक्यामुळं क्रिकेटचा खेळ आणखी Exciting बनलाय आणि नव्या सीमारेषा ओलांडतंय हे मात्र नक्की.

 

(BTW  यीट्स यांची एक कविता मला फार आवडते. खास करून त्यातल्या या ओळी :

Turning and turning in the widening gyre,

The falcon cannot hear the falconer;

Things fall apart; the centre cannot hold;

Mere anarchy is loosed upon the world

– “Second Coming”

आयर्लंडचा उदय म्हणजे सेकंड कमिंग ठरणार का? )

 

 

 

Advertisements