चार फेब्रुवारीला एक बातमी आली. आणि इतर बातम्यांच्या ओघात वाहूनही गेली…

 बोआ नावाच्या एका महिलेच्या मृत्यूची बातमी. अंदमानात एका बेटावर राहणारी बोआ मरण पावली, आणि तिच्या बरोबरच एक भाषाही लुप्त झाली. ८५ वर्षांची बोआ गेली आणी ‘बो’ भाषा बोलू शकणारं कुणीच उरलं नाही. बो भाषा, म्हणजे ग्रेट अंदमानच्या दहा मूळ भाषांपैकी एक. आदिमानवाच्या भाषेच्या थेट वंशज असलेल्या या भाषा. काळाबरोबर अंदमानी लोक इतर भाषांकडे वळले आहेत. बोआबरोबरच बो भाषा संपली आणि ६५ हजार वर्ष जुना इतिहास नष्ट झाला. जगाकडे बघण्याचा एक दृष्टीकोनही संपुष्टात आला.

भाषा नुसतीच मरत नाही. तिच्यासोबत संस्कृतीही नाश पावते.

अंदमानात आता बो समाजाचे केवळ ५२ लोक उरले आहेत. आणि त्यांपैकी कोणालाही आपली मूळ भाषा बोलता येत नाही. ‘बो’ची स्वतःची अशी कोणती लिपी नव्हती, हेही तिच्या विनाशाचं एक कारण. बोआ जीवंत होती, तोवर तिच्या बोलीतले शब्द, उच्चार रेकॉर्ड करण्याचं काम अनेक भाषातज्ञांनी केलंय. त्यामुळंच तिचा आवाज, ते शब्द आजही ऐकता येतात. काही शब्दांचा अर्थ, या तज्ञांनी जतन केलाय. पण तरीही आता ‘बो’ बोलणारं कोणीही उरलेलं नाही. एका भाषेचा असा मृत्यू चटका लावून गेला.

मराठीवर निदान ती वेळ तर आलेली नाही. पण आजची मराठीची स्थितीही चिंताजनक नक्कीच आहे. फक्त मराठीच नाही, तर इतर भाषाही बदलाचा सामना करतायत. भाषा, खास करून बोलीभाषा लुप्त होण्याचा वेग वाढत चाललाय, असं तज्ञांचं मत आहे. ‘लिव्हिंग टंग्ज इन्स्टिट्यूट ऑफ एन्डेन्जर्ड लँग्वेजेस’च्या प्रोफेसर डेव्हिड हॅरिसन यांनी टाईम मॅगझिनशी बोलताना महत्त्वाची गोष्ट उघड केलीय. त्यांच्या संशोधनानुसार दर चौदा दिवसांनी, जगातली एक बोलीभाषा लुप्त होते आहे. ग्लोबलायझेशन आणि शहरीकरणामुळं वाढलेलं स्थलांतर यासाठी कारणीभूत आहे. जगात सध्या सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. आणि जगातील ८० टक्के लोक केवळ ८३ भाषा बोलतात. (टाईम मॅगझिन )

इंग्लिश, फ्रेन्च सारख्या भाषाही बदलांपासून वाचलेल्या नाहीत. क्रिकेट, फुटबॉलसारखे खेळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची तर एक वेगळीच परिभाषा तयार झाली आहे. इंटरनेटनं तर भाषा ही संकल्पनाच बदलवून टाकलीय. आता बोलणं कमी होत चाललंय, कमी शब्दांचा वापर करणं सोयीचं बनत चाललंय. एसएमएस आणि ट्विटरमुळे तर वेगळीच इंग्लिश उदयाला आली आहे. म्हणूनच मला वाटतं, मराठीपुढचं आव्हान फक्त मराठीपुढचं नाही. मराठीच्या संवर्धनाचे प्रयत्न करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जितक्या जास्त माध्यमांमध्ये मराठी उपलब्ध होईल, तितकंच मराठीचं आयुष्य वाढीस लागेल. आणि हो, नवे शब्द आले, तर भाषा आणखी समृद्धच बनेल.

हरवत चाललेल्या भाषांचा विषय निघाला की मला दोन भाषांची नेहमी आठवण होते, न्यूझीलंडची माओरी आणि हवाई बेटांवरची मूळ भाषा. एकेकाळी संकटात असलेल्या या भाषा आता पुन्हा बहरल्यायत. मग आधीच फुललेलं मराठीचं झाड कायम जीवंत ठेवणं अवघड नक्कीच नाही.

मराठी भाषा मरते आहे, मराठीचं काय होणार, हे प्रश्नच उरणार नाहीत मग.

 – जान्हवी मुळे

Advertisements