“झाडं लावली की कसं, रोज फळं मिळतायत.”

“मी तर स्ट्रॉबेरीच लावणारेय”

“मला तर राईस आवडतो, छान दिसते भातशेती..”

“चला, गाईंचं दूध काढण्याची वेळ झाली…”

“मला लाईम ट्री पाठव ना..”

ही चर्चा रंगली आहे आधुनिक शेतक-यांमध्ये. पण कुठल्या गावच्या पारावर नाही, तर फेसबुकच्या ऑनलाईन चावडीवर.. अर्थातच, या गप्पा ख-याखु-या शेतीविषयी चाललेल्या नाहीत, तर फार्मविल या फार्मिंग गेमविषयी सगळे बोलतायत.

आजकाल फेसबुकवर सगळ्यांनाच फार्मविल या गेमची भुरळ पडलेली दिसतेय. (माझाही अपवाद नाही…) फेसबुक यूजर्सना, या गेमच्या माध्यमातून व्हर्च्युअल फार्मिंग करता येतं. क्यूट ग्राफिक्स, अगदी खरे वाटावेत असे साऊंड् इफेक्टस यामुळं फार्मविल दिसायला आणि खेळायलाही अगदी छान वाटतं.

या आभासी दुनियेत, एंट्री घेणारा प्रत्येक खेळाडू आहे एक फार्मर. सुरूवातीला गेममध्ये लॉग इन केल्यावर प्रत्येक फार्मरला काही जमीन आणि बी-बियाणं विकत घेण्यासाठी कॉइन्स मिळतात. त्याचा वापर करून तुम्ही व्हर्च्युअल शेती करू शकता. म्हणजेच बी पेरणं, ते उगवणं, पिक काढणं, गाई-गुरांची काळजी घेणं, सारं काही… काही पिकं चार तासांत तयार होतात, काहींना दोन, चार दिवस लागतात. जसजसं उत्पन्न वाढतं, तसं फार्मर्स वरच्या लेव्हलवर पोहोचतात. त्यांना नवी जमीन विकत घेता येते, जास्त उत्पन्न देणारी पिकं, झाडं लावता येतात. तुम्ही आपली शेती सजवण्यासाठी एखादं तळं, पिकनिक सेट, वेगवेगळ्या प्रकारची कुंपणं विकत घेऊ शकता. आणि हो, तुमचे मित्रही फार्मविलवर असतील, तर या सगळ्या गोष्टी त्यांना फ्री-गिफ्ट म्हणूनही पाठवू शकता. (लहानपणी नवा व्यापार, बिझनेस सारखे खेळ असयाचे ना, तसंच.)

फार्मविल गेम लॉन्च झाला १९ जूनला. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात, फार्मविल म्हणजे फेसबुकवरचं सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप्लिकेशन बनलंय. फक्त फेसबुकवर नाही, तर एकूणच सोशल नेटवर्किंग अॅप्लिकेशन्समध्ये आता फार्मविल आघाडीवरेय. जवळजवळ साडेतीन कोटींहून जास्त लोक फार्मविलमध्ये व्हर्च्युअल शेती करतायत. पण फार्मविलबरोबरच बार्न बडी, फार्म टाऊन, फार्म लँड या आणि अशा इतर फार्मिंग गेम्सचा विचार केला तर, हा आक़डा साडेसात कोटींपर्यंत जातो. आणि दररोज, त्यात भरच पडतेय. (संदर्भ- http://www.allfacebook.com/ )

विशेष म्हणजे प्रत्यक्षात शेती-उद्योग संकटात सापडला असताना, इंटरनेटवर मात्र शेतक-यांची संख्या वाढतेय. फार्मविलमध्ये व्हर्च्युअल शेती करताना आठवण येते माझ्या गावाची, तिथल्या जुन्या वाड्याची ज्याच्या जागी आता नवं घऱ बांधलंय. मुंबईच्या जवळच्या माझ्या गावात शेतीचं प्रमाण घटत चाललंय. शेतजमीनी एन-ए (नॉन-अॅग्रीकल्चरल) करून घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय.

अर्थात त्यामागेही काही कारणं आहेतच. शेती करणं इंटरनेटवर सोपं आहे, पण प्रत्यक्षात मात्र चित्र काही वेगळंच आहे. बेभरवशाचा पाऊस, सरकारची दूरदृष्टीहीन धोरणं, कष्टमय आयुष्य, कोणतीही पेन्शन नाही. शेतकरी असणं, त्यातही अल्पभूधारक, म्हणजे सोपं नाही गड्या! पण बहुतेकजण या वास्तवापासून अनभिज्ञ नाहीत.

आणि तरीही, ऑनलाईन गेममध्ये का होईना, शेतीमधला लोकांचा रस वाढतोय. हे ही नसे थोडके! अपना तो यही सपना है.. इंटरनेटवरच्या फार्मिंगसारखी प्रत्यक्षातली शेतीही सोप्पी होऊ दे…

Advertisements