भारताचा त्रेसष्ठावा स्वातंत्र्यदिन.. उजाडला आणि मावळलाही.

नेहमीप्रमाणे दिल्लीत आणि गल्लीत ध्वजवंदना झाली..

टीव्हीवर थेट प्रक्षेपण झालं, कुण्या- कुण्या सेलिब्रिटीजचे बाईट्स चालले..

न्यूजपेपरची पानंही तीन रंगात रंगून गेली…

शाळा-ऑफिसांमध्ये मात्र फारशी वर्दळ नव्हती. नाहीतरी एरवीही अनेकांना सक्काळी सक्काळी उठण्याचा कंटाळाच येतो, आता तर स्वाईन फ्लूचं निमित्तच मिळालंय.

पण तरीही, चौका-चौकात वीराणी घुमत राहिली..

नाक्या- नाक्यावर त्याच त्या चर्चेचे फड रंगले- स्वातंत्र्यदिन की स्वातंत्र्य-दीन?

नेहमीप्रमाणे तुम्ही- आम्ही हिरीरीनं आपलं मत मांडलं (बाय द वे, त्यातल्या किती जणांनी मत दिलं हा प्रश्न वेगळाच..)

तर, नेहमीप्रमाणे दिवस मावळला आणि आमचा उफाळून आलेला देशाभिमानही हळूहळू शांत झाला.. भारतमातेचं गुणगान गाऊन थकलेली बाळं पेंगुळली. कुणी वीकेण्ड सेलिब्रेशनमध्ये रमलं, तर कुणी इंडिपेण्डन्स डे पार्टीत.. कुणाला टिव्हीवर फिल्म्स पाहून पुन्हा देशभक्तीचे उमाळे फुटले.. नेतेमंडळी पुन्हा निवडणुकीचे झेंडे फडकवायच्या तयारीला लागली. हातात तिरंगे घेऊन वणवण भटकणारे छोटी फेरीवाले, आता उद्या काय विकायला घेऊन यायचं, त्याची आखणी करू लागले.

आता मी असं काही लिहितेय, म्हणून लगेच “च् च् निराशावादी!” म्हणून नाकं मुरडू नका.. पण खरंच, बहुतेकदा हे असंच घडतं. बहुतेक जणांच्या बाबतीत. स्वातंत्र्यदिन येतो आणि जातो. स्वातंत्र्य कुठंय? हा प्रश्न मात्र उरतो जे विचार करत नाहीत त्यांना कशानंच फरक पडत नाही.

ज्यांच्या जाणीवा बोथट झाल्यायत ते “काय करणार, इंडियाका कुछ नही होगा” असं म्हणून खांदे उडवतात. ज्यांचं मन अजून कोडगं झालेलं नाही, त्यांना संताप येतो- सगळीकडे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार दिसतो. पण सारं तिथंच थांबतं.

दिवस पालटतो, भारत नावाचा प्रवास सुरू राहतो…

पण एखादा असाही असतो, जो स्वतः चिखलात उतरून गाळ साफ करू लागतो.. थकलेल्याला पाणी देतो, भुकेल्याला दाणा देतो, गांजलेल्याचे आसू पुसून टाकतो…

कुणी असाही असतो जो पदरमोड करून गावचा संसार करतो… दारोदार भटकून लोकांना जागं करतो..

दिवस पालटतो, भारत नावाचा प्रवास सुरू राहतो.

ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारताचा रंग चढतो.. मैदानावर आमचे खेळाडू तिरंगा फडकावतात.. वैज्ञानिक थेट चंद्रावर उतरण्याची तयारी करतात..

अचिव्हमेंट्सचे असे क्षण आम्ही सेलिब्रेट करतो.. आणि पुढे चालू लागतो..

प्रश्न पिच्छा सोडत नाहीत..

का आजही माझ्याच देशातली माणसं भुकेनं मरतात?  का शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागतात?  कष्टांच्या ओझ्याखाली बालपण का दबून जातं? का माणसंच माणसाचा कोंडमारा करतात? का आजही धर्माच्या नावावरून कत्तली होतात? का वंश, जाती आणि भाषेवरून भांडणं होतात? दहशतवादही थेट देशात घुसून थैमान घालतोय. याला जबाबदार कोण?

प्रश्न तर खूप आहेत. उत्तर कोण देणार? आपण कधी स्वतःकडे वळून पाहिलंय? (तोही एक प्रश्नच आहे!)

कबूल, काही स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी देश पणाला लावला. कबूल, काही चुकीच्या निर्णयांची किंमत आपण मोजतोय.

But hey! अशा तक्रारीच करत राहिलो, तर आपणही फार काही करू शकणार नाही. मी तरी हेच ठरवलंय. शक्य आहे ते करत रहायचं. (प्लीज… आता “काहीच शक्य नाहीय हो!” असं रडगाणं गाऊ नका…) आता भूतकाळ तर आपण बदलू शकत नाही, वर्तमानात जे आहे, जसं आहे, ते मान्य करण्यावाचून पर्याय नाही. पण आपलं भविष्य काय असणार आहे, ते आपणच ठरवणार आहोत.

Advertisements