केविनची आणि माझी भेट होऊन पंधरा दिवस झाले आहेत जेमतेम. पण आमची अगदी जुनी मैत्री असल्यासारखं वाटतं आता. दिवसभरात मी बाहेर असते, आणि रात्री कीतीही उशीरा डोकावून पहावं, तर त्याला गुड नाईट केल्या शिवाय झोप लागत नाही..

हा केविन म्हणजे आमचा ससा. तो घरी आला तेव्हा मी लंडनला होते. पण एक दिवस विशालनं माझ्या भावानं जी-मेल वर बोलताना या नव्या पाहुण्याबद्दल सांगितलं. माझ्या काकांना जंगलात फिरत असताना सशाचं हे छोटंसं पिल्लू दिसलं. कावळे टोचून मारत होते त्याला. काकांनी घरी आणलं, तेव्हा त्याचे डोळेही उघडले नव्हते. पण दोनच आठवड्यात आमचा ससा अगदी गुबगुबीत झाला.

मग भूविदनं, माझ्या चुलत भावानं त्याचं नाव ठेवलं केविन पीटरसन. होय, तोच इंग्लंडचा क्रिकेटर. हसू येतंय ना? भूविदचं लॉजिकच भन्नाट. आमच्याकडे याआधी रिकी पॉन्टिंग नावाचा बोकापण होता. पण काही झालं तरी सशासारख्या भित्र्या प्राण्याला पीटरसनचं नाव? तरीही मलापण ते नाव आवडलं. पीटरसन असो किंवा आमचा ससा, दोघांचे डोळे अगदी भावूक आहेत.

अँड वेल, तसा आमचा केविन पण ओरिजिनल केविनसारखा टॅलेन्टेड आहे हं! सशाचं ते पिल्लू कसं तुरूतुरू पळतं. घरात लपून बसलं की सगळ्यांच्या जीवाला घोर लावतं आणि जेवणाच्या वेळी भूक लागली, की हळूच बाहेर येतं. ड्रॉपरनं मटामटा दूध पिऊन लगेच पुन्हा पळण्याच्या तयारीत. महाशय इतक्यातच बाहेरची माणसं ओळखू लागले आहेत. आणि घरातल्यांचं मनही कळतं बरं त्यांना.

माझ्याशी तर केविनची खास गट्टी जमली आहे. एवढासा तो जीव. पण त्याच्या प्रत्येक हालचालीतून काहीतरी जाणवतं. त्याची जगण्यासाठी चाललेली धडपड बरंच काही शिकवून जाते. खरं सांगायचं, तर माझ्यासाठी गेले काही महिने खूप धावपळीचे होते. I was fighting with myself- the moral battle, you know… कामामध्ये एवढी बुडून जात होते, की घरातल्यांपासून मित्र मैत्रिणींपासून दुरावत चालले होते. पण केविननं काय जादू केली आहे काय माहित. मला माझं आयुष्य नव्यानं जगावसं वाटू लागलंय. . 🙂

Advertisements